पायवाट बंद केल्यामुळे तब्बल अर्धातास रेल्वे रोखून नागरिकांनी व्यक्त केला रोष : अखेर लोखंडी रॉड हटवून पायवाट केली खुली
बेळगाव : तानाजी गल्ली रेल्वेगेटनजीक येण्या-जाण्यास सोडण्यात आलेली पायवाटदेखील रेल्वे विभागाने बंद केल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. तब्बल अर्धातास रेल्वे थांबवून नागरिकांनी आपला रोष व्यक्त करत जोवर पायवाट सुरू केली जाणार नाही, तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला. यामुळे बराचकाळ रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घडला.
रेल्वे उड्डाणपूल झाल्यास आसपासच्या गल्ल्यांना फटका बसेल म्हणून तानाजी गल्ली, महाद्वार रोड, फुलबाग गल्ली येथील नागरिकांनी उड्डाणपुलाच्या कामाला विरोध दर्शविला. उड्डाणपुलाऐवजी हवेतर कायमचे रेल्वेगेट बंद करा, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांच्यासमोर करण्यात आली होती. त्यामुळे वर्षभरापूर्वी रेल्वेगेट बंद करून केवळ येण्या-जाण्यास लहानशी जागा सोडण्यात आली होती. सहा महिन्यांपूर्वी या ठिकाणी रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंनी काँक्रिटची भिंत बांधण्यात आली होती.
त्यानंतर काही दिवसांत येण्या-जाण्यास असलेली पायवाट बंद करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाचा सुरू होता. त्यावेळीही परिसरातील नागरिकांनी आंदोलन करत पायवाट बंद करण्यास विरोध दर्शवला. परंतु, या पायवाटेने विद्यार्थी, तसेच नागरिकांचे येणे-जाणे सुरू असते. यावेळी एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने रेल्वेने पुन्हा एकदा पायवाट बंद करण्याचा विचार सुरू केला.
आंदोलन करताच रेल्वे अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
सोमवारी लोखंडी रॉड घालून पायवाट बंद करण्यात आली. यामुळे स्थानिक नागरिकांनी त्याला कडाडून विरोध केला. रेल्वेगेट पूर्णपणे बंद केल्यास शाळेचे विद्यार्थी, तसेच नागरिकांना दोन किलोमीटर पायपीट करावी लागणार असल्याने हे काम तात्काळ थांबवावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच यादरम्यान धावणारी एक मालवाहू रेल्वे थांबवून नागरिकांनी हे आंदोलन करताच रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर याठिकाणी पोहोचले.
नागरिकांसोबत रेल्वे अधिकाऱ्यांची आज बैठक
सायंकाळी 4 च्या सुमारास अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे गोंधळ उडाला. मालवाहू रेल्वे तानाजी गल्ली व रेल्वेस्थानकादरम्यान थांबविण्यात आल्याने रेल्वेवाहतूक ठप्प झाली. यामुळे सांबऱ्याहून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या एक्स्प्रेसही काहीकाळासाठी थांबवाव्या लागल्या. अर्धातास मालवाहू रेल्वे थांबून राहिल्याने याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर दिसून आला. मंगळवारी परिसरातील प्रमुख नागरिकांसोबत रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.









