मारोळी प्रतिनिधी-
अवकाळी पावसाची नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले,यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना जिल्हा संघटक युवराज घुले म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांचा कांदा, सोयाबीन, बाजरी मका यासारखी पिके नष्ट होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामाचे आदेश काढले ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन मंडळ कृषी अधिकारी ,तलाठी यांनी स्वतः जाऊन पंचनामे सुद्धा केलेले आहेत. पंचनाम्यानंतर शेतकऱ्याकडून आधार कार्ड, बँक पासबुक, उतारे आदी कागदपत्रे सुद्धा घेतलेले आहेत.तरीसुद्धा अद्याप मंगळवेढा तालुक्यामधील शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नाही.
सोलापूर जिल्ह्यामधील इतर तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळू लागली आहे परंतु, मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होण्याचे कारण काय?असा सवाल त्यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतर दुबार पेरणीसाठी व्याजाने पैसे काढून शेतामध्ये परत पेरणी केलेली आहे. शेतकरी पंचनामे झाल्यानंतर पैसे मिळतील या अशाने वाट बघतोय तरी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी अन्यथा शासनाने काढलेल्या बोगस आदेशाचा तिरडी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला .
यावेळी आंदोलनामध्ये श्रीमंत केदार ,बाहुबली सावळे, आबा खांडेकर, अर्जुन मुद्गुल, रवी गोवे, प्रभू चंदन शिंदे, रावसाहेब गायकवाड ,संतोष भोसले, पांडुरंग बाबर ,गजानन देशमुख ,जयसिंग घुले, किसन वाघमोडे ,जनार्दन अवघडे, सुरेश पवार ,नानासो मळगुंडे, कलाप्पा पाटील ,हरिभाऊ घुले ,समाधान हेंबाडे, राजू बुरुंगले, भानुदास पडळकर, तानाजी रोडे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी होते.









