काकती ग्रामस्थ शिष्टमंडळातर्फे पीडीओंना निवेदन
काकती : काकती ग्राम पंचायतीने घरपट्टी, स्थावर मालमत्ता करात मोठ्या प्रमाणात वाढ केली असून, ही करवाढ डोईजड झाली आहे. पंधरा दिवसांच्याआत करवाढ मागे न घेतल्यास ग्राम पंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. करवाढ निषेधार्थ ग्रामस्थ शिष्टमंडळाच्या पुढाकारातून ग्राम पंचायत अध्यक्ष, ग्राम विकास अधिकारी यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित त्यांचे साहाय्यक सचिव सोमनाथ बाबी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. निवेदनात म्हटले आहे की, चालू वर्षाच्या ग्राम पंचायत हद्दीतील घराची घरपट्टी व परड्याची जागा यांच्या कराची रक्कम दुपटीने वाढविण्यात आली असून, ती कमी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. घरपट्टी करात निम्याने कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामस्थांच्यावतीने या शिष्टमंडळात महिला कार्यकर्त्या हेमा काजगार, सुजाता खडबडी, महानंदा हिरेमठ, बसय्या हिरेमठ, धानाप्पा खडबडी, शंकर सुळकुडे, परसू बेळगावकर आदींसह नागरिक उपस्थित होते.









