बससेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थी-नागरिकांचे हाल
बेळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून बेळगाव ते राकसकोप मार्गावरील बससेवा विस्कळीत झाली असून विद्यार्थी, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांचे हाल होत आहेत. याबद्दल मानवाधिकार संघाचे राज्यस्तरीय अध्यक्ष अखिल कांबळे यांनी परिवहन विभागाकडे तक्रारीचे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, की राकसकोप गावच्या मध्यापर्यंत बस पोहोचत नाही व ती अर्ध्यावरच परतवली जाते. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बसचालकांची मनमानी सुरू असून प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. बससेवा पूर्ववत न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याप्रसंगी संघटनेचे गोवा विभागाचे अक्षय विदनोरकर व विद्यार्थी उपस्थित होते.









