रस्ता प्रवाशांसाठी धोकादायक बनल्याने आंदोलन करण्याचा दिला इशारा
खानापूर : हलशी-नागरगाळी रस्त्याचे काम गेल्या चारवर्षापासून सुरू आहे. हलशी ते हलगा हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले असून, पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावर पाणी साचून डबक्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतूक करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. गेल्या दोन वर्षात या रस्त्यावर अपघातात सहाजणाना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. येत्या आठ-दहा दिवसात रस्त्या वाहतुकीसाठी सुरळीत करावा अन्यथा सार्वजनिक बांधकाम खाते आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या घरासमोर उग्र आंदोलनाचा इशारा हलगा ग्रा. पं. चे सदस्य रणजीत पाटील आणि हलगा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. हलशी-हलगा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात यावा म्हणून वेळोवेळी मागणी करूनदेखील सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. तसेच आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही या रस्त्याबाबत गांभीर्याने घेतले नसल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आलेला नाही. पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून डबक्याचे स्वरुप आल्याने या रस्त्यावरून साधी दुचाकी चालविणेसुद्धा धोकादायक बनले आहे.
कंत्राटदाराचे पलायन : रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक
गेल्या दोन वर्षापूर्वीपासून हलशी ते हलगा रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. यासाठी दोन्ही बाजूला चरी मारुन रस्ता रुंद करण्यात येणार होता. यासाठी कंत्राटदाराने काम सुरू केले होते. मात्र कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून पलायन केल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या वाढीसाठी दोन्ही बाजूने चरी खोदल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. कंत्राटदाराबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कोणत्याही कारवाईसाठी क्रम घेण्यात आलेला नाही.
हलशी-मेरडा रस्त्याची चाळण
हलशी ते मेरड्यापर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावर गेल्या दोनवर्षात अनेक अपघात झाले आहेत. यात हलगा परिसरातील चारजणाना जीव गमवावा लागला आहे. तसेच काहीजणाना अपघातात जखमी होऊन अंपगत्व आले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी वेळोवेळी करुनदेखील सार्वजनिक बांधकाम खात्याने याबाबत साफ दुर्लक्ष केले आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनाही या रस्त्याबाबत वेळोवेळी निवेदने देवून हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. आमदार विठ्ठल हलगेंकर आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने संपूर्ण रस्ताच उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे हलगा भागातील नागरिकांना या रस्त्यावरुन जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हलगा ग्रा. पं. चे सदस्य रणजीत पाटील यांनी येत्या आठ-दहा दिवसात रस्त्याची तात्पुर्ती डागडुजी करून रस्ता वाहतुकीस सुरळीत न केल्यास सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर व आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.









