संतिबस्तवाड, बेळगाव शहरातील मुस्लीम बांधवांचा तीव्र इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : संतिबस्तवाड धर्मग्रंथ जळीतकांड प्रकरणाला 20 दिवस उलटले तरी अद्याप आरोपींना गजाआड करण्यात आलेले नाही. बकरी-ईदच्या आत आरोपींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतिबस्तवाड व बेळगाव शहरातील मुस्लीम बांधवांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 12 मे रोजी काही समाजकंटकांनी संतिबस्तवाड येथील मशिदीत घुसून तेथे असलेले धर्मग्रंथ व हदीस पळवून नेऊन अन्यत्र जाळले. तसेच यापूर्वीही 6 मार्च रोजी मुस्लीम स्मशानभूमीतील ईदगाह मिनारची नासधूस करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 13 एप्रिल रोजी मिनार व थडग्याचे नुकसान करण्यात आले. याबाबत बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करूनही अद्याप आरोपींवर कारवाई झालेली नाही.
जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि गावातील सर्व समाजाच्या नेत्यांची बैठक घेऊन आरोपींवर कारवाई करावी. तसेच यापुढे अशी घटना न होण्याबाबत पूर्वखबरदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरीदेखील 12 मे रोजी धर्मग्रंथ जळीतकांड घडले. त्यानंतर 16 मे रोजी चन्नम्मा चौकात निदर्शने करून अंजुमन कमिटीच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले होते. पण 21 मे रोजी हिंदू संघटनांनी हिंदू आक्रोश मोर्चा काढून माध्यमांसमोर चुकीची माहिती दिल्याचेही निवेदनात म्हटले आहे. सध्या गावात हिंदू बांधवांनी मुस्लीम व्यापाऱ्यांवर बहिष्कार टाकला आहे. तसेच जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.









