मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही : राज्याध्यक्षांची बेळगाव मनपाला भेट
बेळगाव : विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी छेडलेले आंदोलन गुरुवारी तिसऱ्या दिवशीदेखील सुरूच होते. सरकारने अद्याप मागण्या मान्य केल्या नसल्याने हे आंदोलन शुक्रवारीही सुरूच राहणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्बेंगळूर महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अमृतराज यांनी व बेळगाव महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक संघटनेने आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव महानगरपालिकेसह राज्यातील दहा महानगरपालिकांचे कामकाज मंगळवारपासून ठप्प आहे. अधिकारी व कर्मचारी सामूहिक रजेवर गेले असल्याने महापालिकांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी बेंगळूर येथील फ्रीडम पार्क मैदानावर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सरकारकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे राज्य महापालिका कर्मचारी संघटनेने बेमुदत आंदोलनाची हाक दिली आहे.
त्यानुसार आंदोलन कायम सुरू ठेवण्यात आले आहे. बेळगाव महानगरपालिकेचे कामकाज सलग तिसऱ्या दिवशी ठप्प राहिले. त्यामुळे विविध कामांसाठी महापालिकेत येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. राज्य संघटनेच्या सूचनेनुसार शुक्रवारीदेखील आंदोलन सुरू राहणार आहे. केवळ जन्म-मृत्यू दाखले वितरण विभाग सुरू आहे. तर उर्वरित सर्व विभाग बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेत शुकशुकाट पसरला आहे. अधिकारी व कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून मनपाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत आहेत. त्याचठिकाणी दुपारचे जेवणदेखील केले जात आहे. गुरुवारी बृहन्बेंगळूर महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आणि बेळगाव माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी बेळगाव मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मल्लिक गुंडप्पन्नावर यांनी सांगितले.









