कित्तूर चन्नम्मा चौकात रास्तारोको : भाजपविरोधात नोंदविला निषेध
बेळगाव : उत्तर मतदारसंघातील भाजपचे आमदार अनिल बेनके यांना विधानसभेचे भाजपने तिकीट नाकारले. यामुळे त्यांच्या समर्थकांना एकच धक्का बसला आहे. त्यानंतर त्यांनी भाजपविरोधात तीव्र नारेबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कित्तूर चन्नम्मा चौक येथे निदर्शने करून निषेध नोंदविला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये अनेकांना वगळण्यात आले. त्यामुळे भाजपबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यमान आमदार अनिल बेनके हे मराठा समाजाचे आहेत. म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही, असा आरोप करत मराठा समाजातील नागरिकांनी तसेच समर्थकांनी निषेध नोंदविला. बुधवारी राणी कित्तूर चन्नम्मा चौकामध्ये एक तासाहून अधिक वेळ रास्तारोको करून भाजपच्या हायकमांडचा निषेध नोंदविला आहे.









