Karnataka Border Dispute : महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते एकीकरण समितीच्या मेळाव्यासाठी बेळगावच्या दिशेने जात आहेत. कोगनोळी टोलनाक्याजवळ एकीकरण समितीचे नेते दाखल झाले आहेत. यावेळी पोलीसांकडून एकीकरण समितीच्या नेत्यांना विरोध करण्यात आला आहे. बेळगावच्या सीमेवर कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या नेत्यांना अडवलं असून दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली आहे. बेळगाव कर्नाटक सरकारकडून कलम 144 लागू करण्यात आले असून महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय एकीकरण समितीच्या मेळाव्याला कर्नाटक सरकाने आज सकाळी अचानक बंदी घालत पोलिसी बळाचा वापर करीत मेळावा बंद पाडला आहे. तसेच मेळावास्थळी येणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे.यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यावेळी कोगनोळी टोल नाक्यावर महाराष्ट्रातील नेते ताब्यात घेण्यात आले.
आमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली 10 डिसेंबर रोजी कोल्हापुरातील नर्सरी बागेत धरणे आंदोलन केले होते.यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्यही आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आले होते.या सदस्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना बेळगावमध्ये होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे अंमत्रण दिले होते.यानुसार महाविकास आघाडीचे आमदार हसन मुश्रीफ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजयराव देवणे,संजय पवार,काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण,माजी नगरसेवक शारंगधर देशमुख,संजय माहिते, संजय वाईकर,गुलाबराव घोरपडे,भारती पोवार,उदय पोवार,अक्षय शेळके,गोकुळचे संचालक युवराज पाटील,केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने,राष्ट्रवादीचे राजेश लाटकर,आदील फरास आदी प्रमुख मान्यवरांसह महाविकास आघाडीचे नेते कागलवरून निपाणीमार्गे बेळगावच्या दिशेने जात आहेत.
विरोध केला तरी बेळगावाला जाणारच
सीमाबांधवावर सातत्याने कर्नाटक सरकारचा अन्याय होत आहे. त्यामुळे एकीकरण समितीच्या मेळाव्याला पाठींबा देणार आहे.
सचिन चव्हाण,शहराध्यक्ष,काँग्रेस
राष्ट्रवादीचे 150 हून अधिक कार्यकर्ते सहभागी
आमदार हसन मुश्रीफ यांच्या आदेशनुसार शहरातून राष्ट्रवादीचे 150 हुन अधिक प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
आर.के.पोवार,शहराध्यक्ष,राष्ट्रवादी
मेळाव्यासाठी शिवसैनिकांना आवाहन
मेळाव्यासाठी शिवसैनिक कोणत्याही परिस्थितीत बेळगावला पोहोचणार .सर्व कार्यकर्त्यांना सकाळी पावणे दहा वाजता शाहू नाका येथे एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे.
संजय पवार,शिवसेना जिल्हाप्रमुख (उद्धव ठाकरे गट)
मेळाव्याला जाणारच
मेळाव्याला जाण्याची आमची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पुढे काय कारवाई होईल हा पुढचा भाग आहे. पण मेळाव्याला जाण्याचा आमचा निर्धार कायम आहे.
विजय देवणे, शिवसेना जिल्हा प्रमुख
मला परवानगी नाकारण्याचे कारणच नाही
एका बाजूला दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यात संवाद चालू आहे.मध्येच थोडे तणावग्रस्त झालेले वातावरण निवळण्याचा प्रयत्न चालू आहे.अशा परिस्थितीत मी रीतसर बेळगाव येथे होणाऱ्या मराठी बांधवांच्या मेळाव्यासाठी जाणार होतो.मी एका संविधानिक पदावर काम करतो.याशिवाय तज्ञ समितीचा अध्यक्षही आहे.त्यामुळे मी मेळाव्याला जाणार असल्याचे रीतसर कळवले होते मी तेथे जाऊन मराठी बांधवांशी संवादच साधणार होतो.मी कोणताही वादग्रस्त मुद्दा मांडणार नव्हतो.माझ्यावर कोणताही हिंसात्मक गुन्हा नाही.मात्र मला येण्यास परवानगी नाकारलेली आहे असे समजते.त्याला काही राजकीय वास आहे का हे ही आगामी काळात कळेल.एका राज्यातुन दुसऱ्या राज्यात जाताना खासदारालाच काय कोणालाही परवानगी मागण्याची गरज नाही,असे मला वाटते.पण एका खासदाराला अशी वागणूक असेल तर मराठी बांधवाची तेथे काय अवस्था असेल?पण बेळगावमध्ये माझ्या जाण्याचा परिणाम किंवा त्या कृतीचे कोठेही चुकीचे पडसाद उमटू नयेत. न्यायालयीन कामकाजावर त्याचा परिणाम होऊ नये या साऱ्या दक्षता मला घ्याव्या लागणार आहेत.मी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे.
खासदार धैर्यशिल माने.(सीमा समन्वय समिती अध्यक्ष)
Previous Articleगोव्यात आज मुक्तिदिनाचा आनंदोत्सव
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.