रात्री उशिरा उपतहसीलदारांच्या उपस्थितीत रस्ता केल्यानंतर केला अंत्यविधी
खानापूर : स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता शेतकऱ्याने अडविल्याने मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन करण्यात आले. रात्री उशिरा खानापूर उपतहसीलदार रोहीत बडचीकर यांच्या उपस्थितीत जेसीबीने रस्ता केल्यानंतर बुधवारी रात्री 12 नंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची घटना तालुक्यातील लिंगनमठ येथे घडली. याबाबत लिंगनमठ ग्रा. पं. चे अध्यक्ष काशीम हट्टीहोळी यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, लिंगनमठ येथे सार्वजनिक स्मशानभूमीसाठी शासनाकडून जागा मंजूर झाली असून या जागेत स्मशानभूमी तयार केली आहे. या स्मशानभूमीत गेल्या कित्येक वर्षांपासून अंत्यविधी करण्यात येत आहे. स्मशानभूमीकडे राऊत यांच्या शेतातून रस्ता जातो. मात्र, राऊत यांनी गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता बंद केला आहे. यामुळे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने लिंगनमठवासियांनी वेळोवेळी पोलीसस्थानक तसेच तहसीलदार, जिल्हा पंचायतीकडे अर्ज, विनंत्या केल्या होत्या. मात्र, याची दखल घेण्यात आली नव्हती.
बुधवारी नंदगड पोलीसस्थानक कार्यक्षेत्रात एका अज्ञाताचा मृत्यू झाला होता. लिंगनमठ पंचायतीच्या कार्यक्षेत्रात या बेवारसाचा मृत्यू झाल्याने नंदगड पोलिसांनी अंत्यविधीची जबाबदारी लिंगनमठवासियांवर सोपविली होती. मृतदेह घेऊन जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी हा मृतदेह रामनगर, अळणावर रस्त्यावर ठेवून आंदोलन केले. याबाबतची माहिती नंदगड पोलीस आणि खानापूर तहसीलदारांना देण्यात आली. मात्र तहसीलदारांनी याबाबत उपतहसीलदारांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकली होती. उपतहसीलदार रोहीत बडचीकर यांनीही काशीम हट्टीहोळी यांना अरेरावीची भाषा वापरत मृतदेहावर अंत्यसंस्कार उरकून घ्यावेत, असे सांगून संपर्क बंद केला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून रात्री 10 वाजेपर्यंत आंदोलन केले. रात्री 10 वाजता उपतहसीलदार रोहीत बडचीकर लिंगनमठ येथे उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून जमीनमालक राऊत यांना विश्वासात घेऊन जेसीबीद्वारे स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता करण्यात आला. त्यानंतर मृतदेहावर रात्री 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.









