सेव्ह म्हादई – सेव्ह गोवा फ्रंटतर्फे आयोजन
प्रतिनिधी/ पणजी
सेव्ह म्हादई – सेव्ह गोवा प्रंट व इतर काही राजकीय पक्षातर्फे म्हादईच्या रक्षणासाठी मिरामार समुद्रकिनारी मानवी सांखळी तयार करण्यात आली. त्यात शेकडो पर्यावरणप्रेमी लोक सहभागी झाले होते. राजधानी पणजी येथे एकूण 7 ठिकाणी अशा प्रकारे मानवी साखळी कऊन म्हादईसाठी जागृती करण्यात आली. म्हादई नदी गोव्याकरीता जीवनदायिनी असून तिचे पाणी कर्नाटक या शेजारी राज्याने वळवले म्हणून निषेध नोंदविण्यासाठी हा मानवी सांखळीचा उपक्रम राबविण्यात आला. गोवा फॉरवर्ड तसेच काँग्रेस पक्षाने त्यास पाठिंबा दिला आणि त्यांचे पदाधिकारी मानवी साखळीत सामील झाले होते.

जुने सचिवालय, सांता मोनिका जेटी, कला अकादमी, कांपाल गार्डन, कांपाल इनडोअर स्टेडियम, करंजाळे – मिरामार समुद्रकिनारी अशा विविध ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन मानवी साखळी तयार केली. एकूण 7 कि.मी. क्षेत्रात हा साखळीचा उपक्रम राबविण्यात आला. ‘आमची म्हादई आम्हाला हवी’ अशा घोषणा देण्यात आल्या. शनिवारी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत हा उपक्रम साकारण्यात आला. त्यावेळी म्हादईचे महत्व सांगणारे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. म्हादईचे रक्षण करा आणि तिला वाचवा असा संदेश या मानवी साखळी उपक्रमातून देण्यात आला. म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवल्याने तिचे गोव्यातील पात्र सुकत चालले असल्याचे या उपक्रमातून निदर्शनास आणून देण्यात आले. सरकारने जागे व्हावे, असा इशारा मानवी साखळीतून देण्यात आला.









