वेतनवाढीसह अनेक मागण्यांसाठी निवेदन : ग्रामीण डाक सेवकांना ना पेन्शन ना कोणतीही हमी नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर
बेळगाव : ग्रामीण भागात काम करणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेतनामध्ये काम करावे लागते. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण डाक सेवकांना कोणत्याही सेवा-सुविधा उपलब्ध नाहीत. निवृत्तीला आलेले कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पगारवाढीसह इतर मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी बुधवारी ऑल इंडिया डाक सेवा युनियनच्या माध्यमातून मुख्य पोस्ट कार्यालयात आंदोलन करण्यात आले. ग्रामीण डाक सेवकांना ना पेन्शन ना कोणतीही हमी नसल्यामुळे कुटुंब कसे चालवावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी असल्याने बीपीएल रेशनकार्डही रद्द करावे लागले. असे असताना पगार मात्र तोकडाच आहे. याऐवजी पूर्ण वेळ काम करून घ्या आणि पूर्ण वेतन द्या, अशी मागणी ग्रामीण डाक सेवकांनी केली. शहरी डाक सेवक व ग्रामीण डाक सेवक यांच्या वेतनामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. हा फरक नेमका कशासाठी? असा सवालही उपस्थित करण्यात आला.
मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा
कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात बेळगाव परिसरातील ग्रामीण डाक सेवकांनी आंदोलन केले. आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत सरकारला इशारा दिला. आपल्या मागण्यांचे निवेदन टपाल अधीक्षक विजय निडोणी यांना देऊन मागण्या लवकर मान्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामीण डाक सेवक उपस्थित होते.
ग्रामीण भागातील टपाल सेवा ठप्प
बेळगाव, खानापूर, रामदुर्ग यासह जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी ग्रामीण डाक सेवकांनी कामबंद आंदोलन केल्याने टपाल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. ग्रामीण भागात टपालसह बँकिंग सेवा पोहोचविणारा मुख्य दुवाच कामावर नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली. टपाल सेवेसोबतच आयबीपीएस, आधार बेस पेमेंट यासह इतर सेवा बंद होत्या. केंद्र सरकारने मागण्या मान्य न केल्यास डिसेंबर महिन्यात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.
ग्रामीण डाक सेवकांकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष
आम्ही वेळोवेळी केंद्र सरकारकडे मागणी करून देखील ग्रामीण डाक सेवकांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. खेडोपाडी, घरोघरी जाऊन आम्ही सेवा देत असताना सर्वात कमी वेतन आम्हाला दिले जाते. आज अनेक कर्मचारी निवृत्तीच्या वयात आले तरी ते तुटपुंज्या वेतनामध्ये काम करत आहेत. केंद्र सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास यापुढील काळात मोठे आंदोलन केले जाणार आहे.
– रामा आनंदाचे (अध्यक्ष, ग्रामीण डाक सेवक)









