ऑनलाईन टीम / मुंबई :
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. शिवसेनेतील फूट आणि आता अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा गट सत्तेत सहभागी झाल्याने सत्ताधारी वरचढ ठरणार, की विरोधक वरचढ ठरणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. असे असतानाच आज पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस आणि ठाकरे गटाने ‘खोके सरकार हाय हाय’, ‘घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार असो’, अशी घोषणाबाजी करत बॅनर झळकावले.
आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, सतेज पाटील यांच्यासह ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार या आंदोलनात सहभागी होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही आमदार या आंदोलनात सहभागी नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. संख्याबळ घटले असले तरी आम्ही माघार घेणार नाही, असे स्पष्ट करत विरोधकांनी आक्रमक होणार असल्याचे जाहीर केले होते.








