कोल्हापूर प्रतिनिधी
शालार्थ आयडीप्रश्नाबाबत 30 ऑक्टोबर 2023 पासून पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा, शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी दिला आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्यातील शालार्थ आयडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शिक्षकांना शालार्थ आयडी मिळायला नको म्हणून अधिकारी जाणून-बुजून दिरंगाई करत आहेत. अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा हा भयंकर आहे. त्यामुळे आंदोलन काळातील गंभीर परिणामाला आपण जबाबदार राहाल‘ असे, पत्रही आमदार आसगावकर यांनी शिक्षण आयुक्तांना पाठवले आहे.
‘टप्पा अनुदानावरील शिक्षकांना लवकरात लवकर शालार्थ आयडी मिळवून त्यांची यंदाची दिवाळी गोड व्हवी यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. मात्र शिक्षण विभागातील अधिकारी याप्रश्नी सकारात्मक नसल्याचे चित्र आहे. अधिकारी वारंवार चालढकल करीत आहेत. शिक्षण उपसंचालक श्रीराम पानझडे यांच्या उपस्थितीमध्ये 13 जून 2023 रोजी झालेल्या आढावा बैठकीत प्रलंबित शालार्थ आयडीचे प्रकरणे तीन आठवड्यात निकाली काढण्याचे ठरले होते. मात्र शालार्थ आयडी देण्यासाठी लाखो रूपये पगार घेणारे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे आंदोलनाचा निर्णय आमदार आसगावकर यांनी घेतला आहे.









