आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांचे प्रतिपादन : अनेक मंदिर-मठांवर वक्फ बोर्डने दाखविला हक्क
बेळगाव : वक्फ बोर्डमुळे अनेक शेतकऱ्यांना भूमीहीन व्हावे लागले तर अनेक मंदिर-मठांवर आपला हक्क वक्फ बोर्डने दाखविला आहे. येथे हजारो वर्षांपासून हिंदू धर्मियांची सत्ता असताना या जमिनी वक्फ बोर्डकडे जातातच कशा? याविरोधात संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडले आहे. हे आंदोलन कोणत्याही पदासाठी अथवा वैयक्तिक स्वार्थासाठी नसून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन असल्याचे प्रतिपादन विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केले. भाजपच्यावतीने रविवारी शहरातील गांधी भवन येथे वक्फ बोर्ड विरोधात जनजागृती तसेच आंदोलन करण्यात आले. राणी चन्नम्मा चौकापासून फेरी काढून ‘वक्फ बोर्ड हटाव, देश बचाव’ अशा घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला माजी मंत्री रमेश जारकीहोळी, माजी आमदार श्रीमंत पाटील, महेश कुमठळ्ळी, कुमार बंगारप्पा, माजी खासदार प्रताप सिम्हा, बी. व्ही. नायक, किरण जाधव यांच्यासह इतर उपस्थित होते.
दावणगेरी येथे मोठे आंदोलन छेडणार
माजी मंत्री रमेश जारकीहोळी म्हणाले, विजापूर येथून वक्फ बोर्ड विरोधातील आंदोलनाला सुरुवात झाली आणि सध्या संपूर्ण देशभर हे आंदोलन केले जात आहे. हिंदू धर्मियांची मंदिरे, शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डच्या नावाखाली हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला राज्यातील काँग्रेस सरकार पाठबळ देत आहे. त्यामुळे या विरोधात संपूर्ण राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. दावणगेरी येथे दहा लाख लोक एकत्रित करून मोठे आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार लिंबावळींकडून घरचा आहेर
कर्नाटक भाजपमध्ये सध्या दोन गट कार्यरत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. रविवारी झालेल्या आंदोलनावेळीही अंतर्गत धुसफूस बाहेर आली.माजी आमदार अरविंद लिंबावळी यांनी प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्यावरच टीका केली. यत्नाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना या आंदोलनाची काही नेते खिल्ली उडवत असल्याचे सांगत त्यांनी जोरदार प्रहार केला. त्यामुळे हे आंदोलन नेमके वक्फ बोर्डविरोधात होते की, भाजपमधील एका गटाला आपले शक्तीप्रदर्शन करायचे होते? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ
भाजपचे वरिष्ठ नेते रमेश जारकीहोळी, विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्या उपस्थितीत रविवारी वक्फ बोर्ड विरोधातील आंदोलन पार पडले. परंतु, या आंदोलनावेळी स्थानिक भाजप पदाधिकारी मात्र कुठेही दिसले नाहीत. ना माजी आमदार, ना नगरसेवक, ना पदाधिकारी. भाजपचे नेते किरण जाधव वगळता इतर कोणतेच स्थानिक नेते अथवा पदाधिकारी कार्यक्रमाकडे फिरकले नसल्याने याचीच चर्चा रंगली होती.









