सांगली :
शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग आखला जात आहे. तो रद्द झाला पाहिजे, त्यासाठी रक्त सांडावे लागले तरी मागे हटणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देत बाधीत शेतकऱ्यांनी भर पावसात नागपूर रत्नागिरी महामार्ग रोखला. खासदार विशाल पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सतिश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आपण शेतकरी आणि शासन यांच्यात मध्यस्तीस तयार असल्याचेही खासदार विशाल पाटील यांनी सांगितले.
शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी बाधित शेतकरी बचाव समितीच्यावतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी भर पावसात महामार्ग रोखल्याने रस्त्यावर दोन्ही बाजूनां सुमारे पाच ते सहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. परंतु रूग्णवाहिकेला गर्दीतून रस्ता काढून देण्यात आला. शेतकऱ्यांनी शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, खाली मुंडी वर पाय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती.
खासदार विशाल पाटील म्हणाले, आम्ही विकासाच्या विरोधात नाही. मात्र महामार्गात अनेक ठीकाणी मोठमोठे पूल बांधले जाणार आहेत. यामुळे महापुरात पाणी साचून शहरे-गावे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. या सगळयाचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा.
महेश खराडे म्हणाले, कृषी दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावे लागणे ही शोकांतिका आहे. वर्धा-गोवा शक्तीपीठ महामार्गाची कुणीही मागणी केलेली नाही. मग कुणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार 20 हजार कोटींचे कर्ज काढून महामार्ग उभारणार आहे. ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, आमदार, खासदार जगवण्यासाठीच हा अट्टाहास असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रभाकर तोडकर, प्रवीण पाटील, उमेश एडके, सौ. शुभागिनी शिंदे, सौ. लता कांबळे, बाळासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. आंदोलनात यशवंत हारूगडे, रघुनाथ पाटील, आधीक पाटील, विष्णू पाटील, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, अनिल माळी, अरुण पाटील, एकनाथ कोळी, बाळासाहेब लिंबेकाई, सुधाकर पाटील, रावसाहेब पाटील, अरुण कवठेकर, संतोष आंबी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व महिला सहभागी झाले.
- खराडेसह सहा आंदोलकांना अटक व सुटका
रास्ता रोकोदरम्यान महेश खराडे, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, उमेश एडके, भूषण गुरव, प्रदीप माने, महावीर चौगुले, शांतीनाथ लिंबेकाई यांना पोलिसांनी अटक केली. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
- शेतकरी आणि शासन यांच्यात मध्यस्तीला तयार
आपणही शक्तिपीठ महामार्गामुळे बाधीत शेतकरी आहोत. जिल्हयात सात हजार खातेदार आणि सुमारे दोन हजार कुटूंब या प्रकल्पामुळे बाधीत होतात. शासन विकासकामे करत आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे सांगली जिल्हयाची कनेक्टीव्हीटी वाढेल. काही दिवसांनी पुणे बेंगलोर ग्रीन कॅरीडॉरही होईल. केवळ विरोधाला विरोध करणे योग्य नाही. हायवेचा मार्ग पूरपट्ट्यातून निवडला. वडणेरे समितीच्या अहवालात अलमट्टी धरणाचा उल्लेख नाही. पण रस्ते, पूल यांचा उल्लेख आहे. या महामार्गाबाबतही अहवालही करावा. चांगला रस्ता होतोय. त्याला पाठींबा आहे. विरोधाबरोबर महामार्गांच्या बाजूनेही शेतकरी आहेत. तरीही बळजबरीने शेती ताब्यात घेणे चुकीचे आहे. खेळीमेळीत शेतकऱ्यांच्या सहमतीने जमिनी घ्या. त्यांच्या शंकांचे निरसन करा, अशी शासनाला विनंती आहे. शेतकऱ्यांच्या गावनिहाय बैठका घ्या. बाधीत शेतकऱ्यांचे नेमके मत जाणून घ्या. शासन आणि शेतकरी यांच्यात मध्यस्ती करण्यास आपण तयार आहोत.
-खासदार विशाल पाटील, सांगली








