सावंतवाडी । प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमा प्रश्नसंदर्भात बेळगाव येथे सोमवारी अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनावर कर्नाटक शासनाने बेळगाव येथे कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन होणार असल्याने बंदी आणली आहे. तसेच महाराष्ट्रातून बेळगावला येणाऱ्या नेत्यांवरही बंदी आणण्यात आली आहे . कर्नाटक शासनाच्या या दडपशाहीचा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. बेळगाव आणि सीमा भागात अनेक मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी 56 वर्षाहून अधिक काळ लढा देत आहेत. कित्येक वर्षे होऊनही प्रश्न सुटला नाही. बेळगाव आणि सीमा भागातील मराठी बांधव सातत्याने संघर्ष करीत आहेत. परंतु कर्नाटकात येणारे प्रत्येक सरकार दडपशाही करून मराठी बांधवावर अन्याय करत आहे . केंद्र सरकारकडे हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली. सीमा प्रश्न सुटेपर्यंत हा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी वारंवार करण्यात आली. परंतु ,केंद्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले. महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी सीमा प्रश्नसंदर्भात अधिवेशन आयोजित केले. परंतु , कर्नाटक मधील शासनाने बेळगाव येथे कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन असल्याच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनावर बंदी आणली आहे. तसेच या अधिवेशनासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांवर बंदी आणण्यात आली आहे याचा आपण तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे केसरकर यांनी सांगितले . आज महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. केंद्रातही भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपाच्या सरकारने सीमा प्रश्न सुटावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केसरकर यांनी केली आहे.









