जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निदर्शने
बेळगाव : लोकसभेतील सुरक्षेच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांवर केंद्र सरकारने निलंबनाची कारवाई केली. या विरोधात बेळगाव जिल्हा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी निदर्शने करून भाजपच्या केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. ही कृती लोकशाहीसाठी घातक असल्याने आता देशातील नागरिकांनीच भाजपला धडा शिकवावा, अशा घोषणा या दरम्यान देण्यात आल्या. सुरक्षेचे कडे तोडून काही युवक थेट लोकसभेमध्ये घुसले. त्यांनी धुराच्या नळकांड्या फोडून घोषणाबाजी केली. देशाच्या सर्वोच्च सभागृहात सुरक्षा यंत्रणा निकामी ठरल्याने काँग्रेस तसेच मित्रपक्षांच्या खासदारांनी संताप व्यक्त केला. परंतु, भाजप सरकारने सूडबुद्धीने खासदारांच्या निलंबनाची कारवाई केली. देशाची लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर भाजपला देशाच्या सत्तेतून खाली खेचावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. आरटीओ सर्कल येथे काँग्रेस भवनपासून आंदोलनाला सुरुवात झाली. चन्नम्मा चौक येथे घेराव घालून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काळे फुगे सोडून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपला निषेध व्यक्त केला. यावेळी राजा सलीम, बसवराज शिरगावी, प्रदीप एम. जे., नगरसेवक अजिम पटवेगार, आलिशा सनदी, माजी नगरसेविका जयश्री माळगी, राजेश्वरी, रजनी बापशेट, विकी सिंग, अकबर सडेकर, शंकर जालगार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.









