22 वर्षीय युवतीच्या मृत्यूची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था / तेहरान
इराणमध्ये 22 वर्षीय युवती महसा अमिनीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यावर लोक रस्त्यावर उतरले आहेत. देशाच्या अनेक हिस्स्यांमध्ये महिला निदर्शने करत आहेत. राजधानी तेहरानमध्ये अनेकदा स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रूधूराचा मारा तसेच गोळीबार करावा लागला आाहे. निदर्शनांच्या तिसऱया दिवशी इराण सरकारकडून नैतिक पोलीस प्रमुखाला पदावरून हटविण्यात आले आहे.
22 र्वीय महसाला पोलिसांनी हिजाब योग्यप्रकारे न परिधान केल्याने ताब्यात घेतले होते. पोलीस कोठडीत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी देशाच्या विविध भागांमध्ये निदर्शने सुरू केली आहेत. या निदर्शनांमध्ये आतापर्यंत दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. तर मोठय़ा संख्येत लोक जखमी झाले आहेत. इराणच्या दिवनदर्राह शहरात सोमवारी निदर्शनात जखमी झालेल्या दोन नागरिकांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर 15 जखमींवर उपचार सुरू आहेत.

इराण पोलिसांनी महसा अमिनीच्या मृत्यूला दुर्दैवी ठरविले आहे. पोलीस कोठडीत असताना अमिनीला शारीरिक ईजा पोहोचविण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी फेटाळला आहे. महसा अमिनीचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून अशाप्रकारची घटना घडून नये अशी आमची इच्छा असल्याचे उद्गार ग्रेटर तेहरान पोलीस विभागाचे कमांडर हुसैन रहीमी यांनी काढले आहेत.
अमेरिकेची कठोर भूमिका
महसाच्या मृत्यूप्रकरणी जबाबदारी संबंधितांनी स्वीकारावी अशी अमेरिकेची मागणी आहे. योग्यप्रकारे हिजाब परिधान न केल्याने पोलीस कोठडीत महसाचा मृत्यू होण्याचा प्रकार मानवाधिकारांचा मोठा अपमान असल्याचे विधान व्हाइट हाउस नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या प्रवक्त्याने केले आहे. इराणमध्ये महिलांना स्वतःच्या पसंतीचा पेहराव करण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. इराणने आता महिलांवरील अत्याचार रोखावेत असेही या प्रवक्त्याने म्हटले आहे
इराणमध्ये निदर्शने तीव्र
इराणची राजधानी तेहरान आणि देशातील दुसऱया क्रमांकाचे शहर मशादमध्ये सर्वाधिक निदर्शने होत आहेत. निदर्शनांमध्ये सामील महिलांकडून महसा अमिनीच्या मृत्यूप्रकरणी जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. या निदर्शनांमध्ये महिला स्वतःचा हिजाब उतरवून विरोध व्यक्त करत आहेत. इराणमध्ये हा प्रकार बेकायदेशीर आहे. सुरक्षा दलांनी निदर्शकांना अटक केल्याने विरोध आणखी वाढला आहे. निदर्शनांदरम्यान काही ठिकाणी निदर्शक अन् पोलिसांदरम्यान झटापट देखील झाली आहे.
सोशल मीडियावरही निषेध
इराणमध्ये महसाच्या मृत्यूनंतर अनेक महिलांनी रस्त्यांवर उतरून निदर्शने केली तर सोशल मीडियावर अनोख्याप्रकारे निषेध व्यक्त केला आहे. अनेक महिलांनी स्वतःचा केस कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेक महिलांनी स्वतःचा हिजाब काढत तो रस्त्यावर फेकला आहे. तर काही ठिकाणी हिजाब जाळून निदर्शने करण्यात आली.









