नगरसेवक शंकर पाटील यांच्याशी एलअँडटी-केयूआयडीएफसी अधिकाऱ्यांची चर्चा : आश्वासनानंतर आंदोलन मागे
बेळगाव : काकतीवेस परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे. याबाबत अनेकवेळा एलअँडटीकडे तक्रार करूनदेखील त्याची दखल घेतली जात नसल्याने मंगळवारी नगरसेवक शंकर पाटील यांनी एलअँडटी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर लवकरच ही समस्या सोडविली जाईल, असे आश्वासन एलअँडटी आणि केयूआयटीएफसीच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी एलअँडटी कंपनीकडे आहे. 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनी घालण्यासह गल्लोगल्लीत जलवाहिनी घातली जात आहे. जलवाहिनी घालण्याचे काम जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर असून आता नळजोडणी केली जात आहे. मात्र काकतीवेस व परिसरात गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याने स्वच्छ पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. याबाबत अनेकवेळा एलअँडटीकडे तक्रार करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मंगळवारी नगरसेवक शंकर पाटील यांनी नळाला येणारे गढूळ पाणी एका बकेटात भरले. गढूळ पाण्याने भरलेल्या बकेटसह एलअँडटी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर ही समस्या सोडविली जाईल, असे आश्वासन एलअँडटी व केयूआयडीएफसीच्या अधिकाऱ्यांने दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.









