पुणे / वार्ताहर :
बाईक टॅक्सी सेवा बंद करुन रॅपीडो कंपनीवर कारवाई करा, या मागणीसाठी पुणे प्रादेशिक परीवहन कार्यालयात रिक्षा चालकांनी बेमुदत ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन पोलिसांची परवानगी न घेता करण्यात आल्याने ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे अध्यक्ष डॉ.केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश यांच्यासह 2300 ते 2500 रिक्षाचालकांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षाचालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणे आरटीओ कार्यालयाबाहेर सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी आरटीओच्या परिसरातील रस्त्यांवर रिक्षा उभ्या करुन वाहतूक आडवली. रात्री साडेआठ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु आंदोलनादरम्यान आरटीओ चौकातील सार्वजनिक रस्त्यावरील वाहतूक आडवून स्पीकरवरुन घोषणा देत बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने संबंधित रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.
अधिक वाचा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर
‘रॅपीडो’वर दुसरा गुन्हा दाखल
पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या रॅपीडो बाईक टॅक्सी सेवा विरोधात रिक्षाचालकांनी सोमवारी आंदोलन केले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रोपन ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (रॅपीडो) कंपनी विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेकायदेशीररित्या बाईक टॅक्सी सेवा दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल दाखल केला आहे. यापूर्वी रॅपीडोवर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात कंपनीच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाण्यात मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ यांनी तक्रार दाखल केली आहे.