‘पंचमसाली’चे राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन
बेळगाव : शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या पंचमसाली समाजाच्या नागरिकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी पंचमसाली समाजाच्यावतीने हिरेबागेवाडी येथे आंदोलन करण्यात आले. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून सरकारविरोधातील संताप व्यक्त करण्यात आला. कुडलसंगम येथील बसवजयमृत्युंजय स्वामीजींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आल्याने काहीकाळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागली होती. आरक्षणाच्या मागणीसाठी पंचमसाली समाजाचे आंदोलन सुरू आहे. मंगळवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले. शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी विनाकारण भडकवले. या विरोधात गुरुवारी संपूर्ण राज्यभर पंचमसाली समाजाच्यावतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ स्वामींच्या उपस्थितीत रास्तारोको करण्यात आला.
सरकारच्याविरोधात घोषणा देत आपली नाराजी समाजबांधवांनी व्यक्त केली. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद केल्याने काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये झटापटही झाली. काहीकाळानंतर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. माध्यमांशी बोलताना बसवजयमृत्युंजय स्वामी म्हणाले, राज्यातील काँग्रेस सरकार हे पंचमसाली समाजाच्या विरोधात आहे. या भावनेतूनच मंगळवारी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न झाला. याचा निषेध संपूर्ण राज्यभर सुरू आहे. अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीत आरक्षणासाठी आंदोलन सुरूच राहील. राज्य सरकारने याबाबत आपली भूमिका लवकरच स्पष्ट करावी, असा इशारा त्यांनी दिला.









