उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांच्या अटकेला न्यायालयाकडून मंगळवारपर्यंत म्हणजे 10 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. या निर्णयानुसार आता मंगळवारपर्यंत पंजाब पोलिसांनी कोणतीही कारवाई करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. मोहाली न्यायालयाच्या अटक वॉरंटविरोधात पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अनूप चितकारा यांच्या घरी रात्री उशिरा यावर सुनावणी झाली. याप्रकरणी न्यायालयाने त्यांच्या अटकेला मंगळवारपर्यंत स्थगिती दिली आहे. हा सत्याचा आणि न्यायाचा आणखी एक विजय असल्याचे बग्गा यांच्या वडिलांनी म्हटले आहे. 1 एप्रिल 2022 रोजी पंजाब पोलिसांनी सोशल मीडियावर खोटी जातीय विधाने करणे, लोकांना भडकावणे, द्वेष पसरवणे यासाठी बग्गांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी त्यांना शुक्रवारी पंजाब पोलिसांनी दिल्लीतून अटक केली होती, मात्र हरियाणा आणि दिल्ली पोलिसांनी त्यांची सुटका केली होती.









