वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
सिलिकॉन व्हॅली बँकेचे दिवाळे वाजल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी अमेरिकेतील सर्वसामान्य ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेची बँक व्यवस्था सुरक्षित असून सर्वसामान्य लोक या व्यवस्थेवर विश्वास ठेवू शकतात. त्यांचे पैसे आणि ठेवी सुरक्षित आहेत. अमेरिकेत अचानक आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना दोन बँका बुडीत खाती निघाल्यामुळे सर्वसामान्यांना एकंतर बँकिंग व्यवस्थेवरच शंका वाटू लागली असून त्यामुळे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी नागरीकांना परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. राष्ट्राध्यक्षांच्या विधानांनंतर गुंतवणूकदार आणि ठेवीदारांना दिलासा मिळू शकेल असा विश्वास अमेरिकेतील काही अर्थतज्ञ व्यक्त करीत आहेत.









