पत्रकार परिषदेत एनजीओ सदस्यांची मागणी : पोलिसांनी योग्यप्रकारे हे प्रकरण चौकशी करावी
प्रतिनिधी /बेळगाव
चित्रदुर्ग येथील मुर्घामठाच्या स्वामींनी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहेत. हे उघडकीस आले आहे. म्हैसूर येथील वडनाडी या सेवाभावी संस्थेने हे प्रकरण उघडकीस काढले. त्यामुळे त्यांना आता धमकी दिली जात आहे. तेंव्हा त्यांनाही संरक्षण द्यावे, तसेच अत्याचारग्रस्त मुलींना देखील संरक्षण द्यावे, अशी मागणी नेटवर्क ऑफ ऍन्टी ट्रफिकींग या एनजीओचे ऍड. बी. एल. पाटील आणि व्ही. सुशिला यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
केवळ दोन मुलींवरच नाही तर आणखीन काही मुलींवरही अत्याचार झाल्याचा आरोपदेखील केला आहे. पोलिसांनी योग्यप्रकारे हे प्रकरण चौकशी करून स्वामींवर गुन्हा दाखल करून त्यांना न्याय दिला पाहिजे. मुलींवर अशाप्रकारे अत्याचार होत असतील तर राज्यातील कायदा व सुव्यवस्था योग्य नसल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकामध्ये कायदा व सुव्यवस्था उत्तम आहे. मात्र त्याचा योग्यप्रकारे वापर केला पाहिजे, अशा घटना घडू नये यासाठी प्रथमच दक्षता घेतली पाहिजे.
सध्या असलेल्या या प्रकरणामध्ये बऱयाच जणांनी दबाव घातला आहे. त्यामुळे यातील साक्षी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील होण्याची शक्मयता आहे. साक्षीदारांना धमकावणे असे प्रकार सुरू होणार आहेत. तेंव्हा पोलिसांनी संरक्षण देणे महत्त्वाचे आहे. इतकी गंभीर घटना घडूनदेखील अद्याप सीडब्ल्युसी (चाईल्ड वेल्फअर कमिटी)ने त्या मुलींची साधी चौकशी केली नाही. त्यांच्या कुटुंबालाही भेट दिली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. अशा घटनांविरोधात सर्व एनजीओंनी एकत्र येवून विरोध करणे महत्त्वाचे आहे, असे देखील त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.
न्यायालयामध्ये देखील सरकारी पक्षाने योग्यप्रकारे पुरावे दाखल करून त्या मुलींना न्याय मिळवून द्यावा. मठामध्ये अशाप्रकारे मुलींवर अत्याचार होत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. यापुढे अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. अनेक मुलींवर देखील अत्याचार झाल्याचा संशय आहे. त्या मुली हॉस्टेलवर राहतात. तेंव्हा संरक्षण देवून त्यांच्याकडूनही खरे काय आहे ते समोर आणणे महत्त्वाचे आहे. अन्यथा अशाप्रकारे राज्यातील अनेक अल्पवयीन मुली बळी पडणार आहेत. तेंव्हा पोलिसांनी आता मुलींना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले..









