मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पंतप्रधानांना आवाहन
वृत्तसंस्था/ चेन्नई
प्रस्तावित परिसीमन प्रक्रियेवरून तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकारदरमय्ना आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण जारी आहे. याचदरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्याच्या लोकांच्या चिंता दूर करण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारने तामिळनाडूच्या अधिकारांच्या रक्षणासाठी परिसीमनावर विचार करायला हवा. संसदेत एक प्रस्ताव संमत केला जावा, जेणेकरून तामिळनाडूच्या अधिकारांवर कुठलाही अंकुश येऊ नये असे स्टॅलिन यांनी मोदींना उद्देशून म्हटले आहे.
स्टॅलिन यांनी एका शासकीय कार्यक्रमात हे वक्तव्य केले, जेथे त्यांनी अनेक विकासकामांचा शुभारंभ केला आहे. यानंतर त्यांनी राज्यातील परिसीमन वादावरून वक्तव्य केले. पंतप्रधानांना परिसीमनावर निवेदन सादर करण्यासाठी वेळ मागितली आहे. पंतप्रधान मोदी हे रामेश्वरम येथील कार्यक्रमात सामील झाले असून मी शासकीय कार्यक्रमात व्यग्र असल्याने राज्याचे मंत्री थंगम थेन्नारासु आणि राजा कन्नप्पन यांना तेथे पाठविले असल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
तामिळनाडूचा आवाज दडपण्याचा प्रयत्न
परिसीमनाद्वारे केंद्र सरकार तामिळनाडूचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. 22 मार्च रोजी चेन्नईत निष्पक्ष परिसीमनावर संयुक्त कारवाई समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात देशातील विविध राजकीय विचारसरणींच्या नेत्यांनी भाग घेतला होता असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.









