जयसिंगपूर प्रतिनिधी
द केरळ स्टोरी चित्रपट प्रदर्शनासाठी संरक्षण द्यावे. काढलेला फलक पुन्हा लावावा, या मागणीसाठी शिरोळ तालुका सकल हिंदू समाजाच्यावतीने जयसिंगपूर पोलीस ठाण्यावर रविवारी दुपारी 1 वाजता मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिरोळ तालुक्यातील सकल हिंदू समाज आणि वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील झेले चित्रमंदिरमध्ये द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. शनिवारी सायंकाळी चित्रपटाचा फलक काढण्यात आला होता. हा फलक त्वरीत लावावा आणि चित्रपटास संरक्षण द्यावे या मागणीसाठी झेले चित्रमंदिर ते पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी जमलेल्या युवकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
याबाबत पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक स्नेहल टकले आणि ठाणे अंमलदार विलास निकम यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी काढलेला फलक लावण्यात आला. या आंदोलनात सुनिल ताडे, पंकज गुरव, स्वप्निल बामणे, संजय माळी, ऋषिकेश परिट, प्रमोद पाटील, कुमार पुदाले, प्रल्हाद आंबी, पंकज पाटील, अक्षय पाटील, रोहित पाळेकर, शुभम ताडे यांच्यासह तालुक्यातील सकल हिंदू बांधव सहभागी झाले होते.









