चलवेनहट्टी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : चलवेनहट्टी येथील ब्रह्मलिंग देवस्थानच्या साडेतेरा एकर जागेमध्ये प्लॉट पाडून घरांचे बांधकाम सुरू आहे. देवस्थानची जमीन असतानाही काहीजणांकडून परस्पर विक्री करण्यात आल्याने घरांचे बांधकाम तात्काळ थांबवावे, अशी मागणी चलवेनहट्टी ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. बुधवारी चलवेनहट्टी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ब्रह्मलिंग देवस्थानची कागदपत्रे सादर केली. परंतु, काही व्यक्तींकडून या जमिनीवर अनधिकृतरीत्या प्लॉट पाडून विक्री करण्यात आली आहे. तर काहींनी घरांच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. ग्रामस्थांनी याबाबत संबंधितांना जाब विचारल्यास त्यांच्यावरच अरेरावी करण्यात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार करण्यात आली. अनधिकृतरीत्या सुरू असलेले घरांचे बांधकाम तात्काळ थांबवून मंदिराच्या जागेमध्ये जे उत्पन्न मिळते त्याचा वापर मंदिर विकासासाठी करावा, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रे पाहून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. यावेळी मनोहर हुंदरे, लक्ष्मण बडवाण्णाचे, भरमा आलगोंडी, विठ्ठल आलगोंडी, यल्लाप्पा किटवाडकर, प्रकाश बडवाण्णाचे, इराप्पा कलखांबकर, मालोजी सनदी, अंकुश किटवाडकर, भैरू हुंदरे यासह इतर उपस्थित होते.









