शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मागणी : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन
बेळगाव : बांगलादेशामध्ये निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे अल्पसंख्याक हिंदू नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. मंदिरांची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली आहे. यामुळे तेथील अल्पसंख्याक हिंदूंना संरक्षण देण्यात यावे. तसेच कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बांगलादेशामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांकडून तेथील अल्पसंख्याक हिंदू धर्मियांना लक्ष्य करण्यात आले आहे. हिंदूंची घरे, मंदिरे जाळली जात आहेत. महिलांवर अत्याचार करण्यात येत आहेत.
या घटनेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. हिंदू धर्मियांना लक्ष्य केले जात असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रसारित करण्यात येत आहे. अल्पसंख्याक हिंदू धर्मियांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच कोलकाता येथील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयामध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. भविष्यामध्ये अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी कडक कायदे अंमलात आणावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष किरण गावडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









