रत्नागिरी, प्रतिनिधी
Ratnagiri Crime News : रत्नागिरी शहरातील उच्चभुवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजीनगर परिसरात वेश्याव्यवसाय चालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . सिद्धीविनायक नगर या रहिवासी संकुलातील एका फ्लॅटमध्ये हा प्रकार चालवला जात होत़ा गुरूवारी पोलिसांकडून टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये दोघा तरूणींसह तिघा जणांना ताब्यात घेण्यात आल़े शहराच्या महत्वाच्या ठिकाणी चालणाऱ्या या प्रकारामुळे शहर परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालवल्या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र रमाकांत चव्हाण (वय-45,रा. मिरजोळे रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी शहर पोलिसांकडून राजेंद्र याला अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून शिवाजीनगर परिसरातील सिद्धीविनायक नगर येथील फ्लॅटवर वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती.
वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याबाबत शहानिशा करण्यासाठी पोलिसांकडून बोगस गिऱ्हाईक बनून त्याठिकाणी पाठवण्यात आले. दरम्यान, पोलिसांकडून गैरप्रकार चालत असल्याची खात्री मिळताच गुरूवारी दुपारी 2 च्या सुमारास शहर पोलिसांच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला. यावेळी फ्लॅटवर एक इसम दोघा तरूणींकडून वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे पोलिसांना आढळून आले. दोन्ही तरूणींची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. यावेळी एक तरूणी ठाणे मुंब्रा येथील रहिवासी असून दुसरी बिहार येथील असल्याचे समोर आले.
पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला संशयित आरोपी राजेंद्र चव्हाण याने सिद्धीविनायक नगर येथे भाड्याने फ्लॅट घेतला होत़ा याच ठिकाणी तो जिल्ह्याबाहेरून मुलीनां आणून त्यांच्याकडून वेश्याव्यावसाय करुन घेत असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी राजेंद्र चव्हाण याच्याविरूद्ध अनैतिक व्यापार पतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता 24 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.









