आरोग्यमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांची सूचना : सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची पाहणी
प्रतिनिधी/ बेळगाव
बिम्स आवारामध्ये निर्माण करण्यात आलेल्या 250 खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची त्वरित पूर्तता करण्यात येईल. यामध्ये प्राध्यापक, कर्मचारी नेमणूक, इस्पितळासाठी लागणारे साहित्य लवकरच खरेदी करण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात येईल, असे वैद्यकीय आणि कौशल्य विकास मंत्री डॉ. शरणप्रकाश आर. पाटील यांनी सांगितले. तर 450 खाटांच्या नवीन रुग्णालयांसाठी प्रस्ताव देण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना केली.
शहराच्या दौऱ्यावर आलेल्या मंत्री शरणप्रकाश यांनी बिम्स आवारातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची पाहणी करून विकास आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी रुग्णालयातील समस्या मांडल्या. 150 वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे. ही इमारत अत्यंत जुनी झाली असून दुरुस्तीसाठीही मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खाटांची कमतरता निर्माण होत आहे. शहरामध्ये नवीन जागा पाहून 450 खाटांचे नवीन रुग्णालय उभारण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री शरणप्रकाश पाटील यांनी नागरिकांच्या सोयीसाठी 450 खाटांचे नवीन रुग्णालय निर्माण करण्यासाठी प्रस्ताव देण्यात यावा. यावर तातडीने चर्चा करून जागा आणि अंदाज खर्च याबाबत सरकार पातळीवर चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
रुग्णालयाच्या विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी कारणे सांगत अनुदानाचा उपयोग करण्यात विलंब धोरण अवलंबले जात आहे. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत अनुदानाचा वेळेत उपयोग करून घेण्यात यावा, अशी सूचना आमदार प्रकाश हुक्केरी यांनी अधिकाऱ्यांना केली.
आई-मूल रुग्णालयाचे काम सुरू करा
चिकोडी येथे आई-मूल रुग्णालयासाठी अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून याला प्रतिसाद दिला जात नाही. चिकोडी येथील रुग्णांना उपचारासाठी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली येथे जावे लागत आहे. सौंदत्ती, निपाणी, चिकोडी येथे आई-मूल रुग्णालय उभारण्यासाठी 2017 मध्ये अनुमोदन दिले आहे. यासाठी अनुदानही मंजूर करण्यात आले आहे. मात्र रुग्णालय निर्माण झालेले नाही. अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. यासाठी त्वरित नवीन निविदा बोलावून काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रकाश हुक्केरी यांनी केली.
बिम्सच्या कर्मचाऱ्यांची हजेरी तपासणी करा
बिम्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हजेरी आणि प्रत्येक महिन्यात सीसीटीव्ही बायोमेट्रीक हजेरीची तपासणी करण्यात यावी. यानंतरच कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात यावे. कर्मचाऱ्यांना ईएसआय, पीएफ सुविधा देण्यासंदर्भातील कागदपत्रांची पाहणी करण्यात यावी, अशी मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी बिम्स अधिकाऱ्यांना सूचना केली.
यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी, प्राचार्य आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. आण्णासाहेब पाटील, बिम्सचे सीएओ डॉ. सिद्धू हुल्लोळी, जिल्हा शस्त्रचिकित्सक विठ्ठल शिंदे, बिम्स आरएमओ डॉ. सरोजा तिगडी, बिम्सच्या विविध विभागांचे प्राचार्य नामदेव माळगी, प्रकाश कोडली आदी उपस्थित होते.









