संरक्षण दलांच्या सामर्थ्यात होणार वाढ : संरक्षण मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने 21,772 कोटी रुपयांच्या 5 मोठ्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नौदलासाठी आधुनिक क्राफ्ट, वायुदलाच्या सुखोई लढाऊ विमानांसाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट, तटरक्षक दलासाठी हेलिकॉप्टर आणि सैन्याच्या रणगाड्यांच्या ओव्हरहॉलिंगला मंजुरी देण्यात आली आहे.
नौदलासाठी 31 फास्ट अटॅक क्राफ्ट आणि 120 इंटरसेप्टर्सच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. हे फास्ट अटॅक क्राफ्ट किनाऱ्यानजीक कमी तीव्रतेचे मेरीटाइम ऑपरेशन, टेहळणी, गस्त आणि शोध-बचाव मोहिमेसाठी वापरण्यात येणार आहे. चाचेगिरीच्या विरोधातील मोहिमेसाठी देखील ही क्राफ्ट बोट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. याचबरोबर 120 फास्ट इंटरसेप्टर क्राफ्टच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली असून त्या विमानवाहू युद्धनौका, विनाशिका, फ्रिगेट, पाणबुडीला एस्कॉर्ट करू शकतात.
सुखोई-30साठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट
शत्रूच्या रडारपासून बचावासाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट अत्यंत महत्त्वाचे असते. याच वॉरफेयर सूटद्वारे सुखोईची शक्ती आणखी वाढविली जाणार आहे. याकरता संरक्षण अधिग्रहण परिषदेने इलेक्ट्रीनिक वॉरफेयर सूटच्या खरेदीचा निर्णय घेतला आहे. यात एक्सटर्नल एअरबोर्न सेल्फ प्रोटेक्शन जॅमर पॉड, नेक्स्ट जनरेशन रडार वॉर्निंग रिसिव्हर असेल, जो सुखोई-30 ची मोहिमात्मक क्षमता वाढविणार आहे. याचबरोबर सुखोईच्या इंजिन ओव्हरहॉलिंगच्या गरजांवर निर्णय घेत यालाही मंजुरी देण्यात आली आहे.
तटरक्षक दलासाठी 6 एएलएच मंजूर
भारतीय तटरक्षक दलाकडे सागरी क्षेत्रात देखरेख, मदत-बचावकार्याची जबाबदारी असते. तटरक्षक दलासाठी 6 अत्याधुनिक लाइट हेलिकॉप्टर-मरीनच्या खरेदीला संरक्षण अधिग्रहण परिषदेने मंजुरी दिली आहे.
सैन्याच्या रणगाड्यांचे ओव्हरहॉलिंग
सैन्याचा एमबीटी म्हणजेच मेन बॅटल टँक टी-72 आणि टी-90 रणगाडा आणि बीएमपीच्या ओव्हरहॉलिंगला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या भारतीय सैन्याकडे 1700 च्या आसपास टी-90 रणगाडे असून त्यांचे ओव्हरहॉलिंग अलिकडेच झाले आहे. तर 1950 टी-72 रणगाडा आणि 2000 बीएमपीचे ओव्हरहॉलिंग केले जाणार आहे. ओव्हरहॉलिंगमध्ये अचूक मशीनिंग आणि रिसेटिंग तंत्रज्ञानांचा वापर केला जातो.









