अन्न-नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : रेशनमध्ये दक्षिण कर्नाटकात वाढीव नाचणी तर उत्तर कर्नाटकात ज्वारी देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. उत्तर कर्नाटकातील ज्या भागात तांदूळ वापरला जात नाही, त्याठिकाणी दोन किलो ज्वारी वाटप केली जाणार आहे. राज्यातील गोरगरीब जनतेला धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारने केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ व संविधान बचाव आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते आले असताना सर्किट हाऊसवर बोलत होते. दक्षिण कर्नाटकातील मंड्या, म्हैसूर, रामनगर, हासन, चामराजनगर आदी जिल्ह्यांमध्ये नाचणीचे वाटप केले जाते. मात्र सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप होत नाही. यासाठी अद्याप 1 लाख टनाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर उत्तर कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, गदग, विजापूर, गुलबर्गा, बळ्ळारी, रायचूर जिल्ह्यांमध्ये ज्वारी वाटप करण्यासाठी अतिरिक्त 1 लाख टन ज्वारीची गरज आहे. याबाबत केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.
नरेगा योजनेंतर्गत गोरगरिबांना धान्य उपलब्ध करून देण्याबरोबर त्यांना रोजगार मिळवून देणे हाही उद्देश सरकारचा आहे, असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले. जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि केंद्रीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला सकारात्मक संकेत दिला आहे. या घटनेचा निषेध करत दहशवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जिल्ह्यात 1866 रेशनदुकाने कार्यरत असून पीओएसद्वारे रेशनचे वाटप केले जाते. जिल्ह्यात 67,825 अंत्योदय, 10,77,138 बीपीएल असे एकूण 11,44,963 लाभार्थी आहेत. त्यामध्ये दरमहा 39,37,999 लाभार्थी लाभ घेतात. जुलै 2023 पासून 5 किलो तांदळाबरोबर प्रतिव्यक्ती 170 रुपये थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा केली जात होती. मात्र आता निधीऐवजी पाच किलो तांदूळ वाटप केले जात आहेत. विशेषत: मागील वर्षभरात अपात्र ठरलेल्या 11,796 शिधापत्रिका हस्तांतरित करण्यात आल्या असून त्यांच्याकडून 4,75,471 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली.









