337 अंगणवाडी इमारतींचे काम पूर्ण : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
बेळगाव : राज्यात नव्या 3988 अंगणवाड्यांच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. विधानपरिषदेमध्ये आमदार जवराय गौडा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर हेब्बाळकर बोलत होत्या. नवीन अंगणवाडी केंद्रे स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी मिळावी लागते. कारण, अंगणवाडी केंद्रांना पुरवठा करण्यात येणाऱ्या सकस आहार योजना अनुदानात केंद्र सरकारचा 20 टक्के वाटा आहे. तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या व साहाय्यिकांना देण्यात येणाऱ्या मानधनात केंद्र सरकारचा 30 टक्के सहभाग आहे. राज्य सरकारला तांदूळ व गहू ही धान्ये केंद्र सरकार वितरण करीत असते. सध्या राज्यात केंद्र सरकारने अनुमोदन दिलेल्या 65931 अंगणवाडी केंद्र व राज्य सरकार अनुमोदीत 3988 अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. राज्य सरकार पुरस्कृत अंगणवाडी केंद्रांना अनुमोदन मिळण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. राज्यात स्वत:च्या वास्तूमध्ये अंगणवाडी चालविण्यात येणाऱ्या केंद्रांना नव्या इमारतीसाठी मागील दोन वर्षांत 22 हजार 923 लाख रुपये अनुदान वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत 337 अंगणवाडी इमारतीचे काम पूर्ण झाले असल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.
देवदासी पद्धतीच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न : मंत्री हेब्बाळकर यांची विधानपरिषदेत माहिती
राज्यात देवदासी महिलांनाही गृहलक्ष्मी योजनेचा लाभ देण्यात येत आहे. लाभ मिळत नसल्याची अद्याप एकही तक्रार आलेली नाही. योजना सुरळीतपणे सुरू असल्याचे महिला-बालकल्याण, दिव्यांग-ज्येष्ठ नागरिक सबलीकरण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. शुक्रवार दि. 13 रोजी विधान परिषदेमध्ये आमदार हेमलता नायक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री हेब्बाळकर बोलत होत्या. राज्यातील देवदासींना मासिक पेन्शन योजनेतंर्गत दरमहा 2 हजार रूपये, आर्थिक मदत योजनेतंर्गत 30 हजार रुपये तसेच माजी देवदासी निवास योजनेतंर्गत वसती योजनेचा लाभ देण्यात येत आहे. कोप्पळ जिल्ह्यात 6018 देवदासी महिलांपैकी 2653 हयात आहेत. या जिल्ह्यासाठी पुन्हा एकवेळ सर्वेक्षण करून देवदासींना सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. देवदासी या अनिष्ट प्रथेच्या समूळ उच्चाटनासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे हेब्बाळकर म्हणाल्या.









