मातृभाषेसाठी लढणाऱ्यांवर दडपशाहीचा प्रयोग
बेळगाव :
मातृभाषेसाठी न्यायमार्गाने लढा उभारणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते-कार्यकर्त्यांना टार्गेट करण्यात येत आहे. समाजात भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत गेल्या आठवड्यात शुभम शेळके यांना अटक करण्यात आली होती. आता त्यांना तडीपार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त आणि विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयातून शुभम शेळके यांना नोटीस पाठविली आहे. माळमारुती पोलिसांनी मार्केटच्या एसीपींच्या माध्यमातून तडीपार करण्याचा प्रस्ताव विशेष दंडाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. या प्रस्तावावरून नोटीस पाठविली असून 2 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता स्वत: किंवा वकिलामार्फत विशेष दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात आपली बाजू मांडण्याची सूचना पोलीस उपायुक्तांनी त्या नोटिसीत केली आहे. मराठीसाठी आंदोलन केले म्हणून त्यांना रौडी शिटर ठरविले होते. आता तडीपारीचीही प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे संतापाचे वातावरण आहे. अॅड. महेश बिर्जे यांनी या नोटिसीविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.









