कोल्हापूर :
महापालिका नगररचना विभाग आणि हद्दवाढ कृती समितीने समन्वयातून बनविलेला कोल्हापूर शहर हद्दवाढीचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. प्रस्तावात काही त्रुटी राहिल्या आहेत का, याची शहानिशा करुन हद्दवाढीचा परिपूर्ण प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर करणार असल्याचे महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी शहर हद्दवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळास सांगितले. आयुक्त कार्यालयात गुरुवारी दुपारी मनपा प्रशासन आणि हद्दवाढ समितीची बैठक झाली.
बैठकीमध्ये बोलताना समितीचे अॅङ बाबा इंदूलकर म्हणाले, नगररचना विभागाने हद्दवाढीचा प्रस्ताव समितीने केलेल्या पाठपुराव्यानंतर तयार केला. प्रस्तावा संदर्भात नगररचना विभागातील अधिकारी उडावाउडवीची उत्तरे देत होते. असले अधिकारी कोल्हापुरात चालणार नाहीत. त्यांना काम जमत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांना शासनाकडे परत पाठवा, अशी मागणी इंदूलकर यांनी केली. तसेच हद्दवाढीबाबत महापालिकेला मर्यादा आहेत. त्यामुळे आता शासनाचे नाक दाबले पाहिजे. यासाठी राजकीय पक्षांचे शहरातील प्रमुख लोक व समितीने एकत्रित पाठपुरावा केला पाहिजे असे अॅङ इंदूलकर यांनी सांगितले.
दिलीप देसाई यांनी प्रस्तावामध्ये शहरापासून 22 किमी अंतरापर्यंतच्या गावांचा समावेश करावा. 2011 ते 2025 पर्यंत किती लोकसंख्या वाढली आणि महापालिकेकडे उपलब्ध जागा याचीही नोंद प्रस्तावात करावी, असे देसाई यांनी सांगितले. बैठकीला आर. के. पोवार, महेश जाधव, सुजित चव्हाण, बाबा पार्टे, किशोर घाटगे, अशोक भंडारी, श्रीकांत भोसले, गायत्री राऊत, धनश्री तोडकर, वैशाली महाडिक आदी उपस्थित होते.
- हद्दवाढीचा प्रस्ताव तयार
महापालिका निवडणुक लागण्याची शक्यता असल्याने हद्दवाढीचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावा, अशी मागणी हद्दवाढ कृती समितीने केली होती. त्यानुसार हद्दवाढीचा प्रस्ताव परिपूर्ण आहे का, याची शहानिशा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी केली असून आज शुक्रवार 22 रोजी कोल्हापूर शहर हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाला पाठविला जाणार आहे.








