वृत्तसंस्था / कोलकाता
भाजपमधून निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात पश्चिम बंगाल विधानसभेत एक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. नुपूर शर्मा यांच्याकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून हा प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. या प्रस्तावादरम्यान विधानसभेत मोठा गोंधळ झाला, भाजप आमदारांनी विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सभात्याग केला.
भाजप चिथावणीपूर्ण आणि द्वेषाच्या राजकारणाचा मार्ग अवलंबित आहे. आमच्या राज्यात याप्रकरणावरून हिंसा झाल्यावर आम्ही कारवाई केली. परंतु या महिलेला (नुपूर शर्मा) अद्याप अटक झालेली नाही असे कसे होऊ शकते. तिला अटक होणार नाही हे मला माहित आहे. नुपूर शर्मा यांनी कोलकाता पोलिसांकडे 4 आठवडय़ांची मुदत मागितली असल्याचे ममतांनी विधानसभेत म्हटले आहे.
नुपूर यांच्या एका विधानानंतर देशातील काही ठिकाणी हिंसक निदर्शने झाली होती. यात पश्चिम बंगालचाही समावेश होता. वादग्रस्त विधानाप्रकरणी भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले होते. तर नुपूर यांच्या विरोधात कोलकात्यातील एका पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली होती. याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी नुपूर शर्मा यांना 20 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. माझ्या जीवाला धोका असल्याने मी सध्या पोलिसांसमोर हजर राहण्यास असमर्थ असल्याचे नुपूर यांनी ईमेलद्वारे कळविले होते.









