मुख्याधिकाऱ्यांनी मडगाव पालिका बैठकीत दिलेली माहिती : पुण्यातील प्रकल्पाची पडताळणी करण्यासाठी पथक पाठविणार
मडगाव : मडगाव पालिकेचा ओला कचरा सध्या काकोडा आणि साळगाव येथे पाठविण्यात येत आहे. यापुढे सोनसड्यावर कायमस्वरूपी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज असून पालिकेकडे पुणेस्थित एका कंपनीकडून प्रस्ताव आला आहे, असे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी शुक्रवारी झालेल्या मडगाव पालिका मंडळाच्या बैठकीत मंडळाच्या नजरेस आणून दिले. सॅनिटरी समितीचे अध्यक्ष कामिलो बार्रेटो तसेच तांत्रिक विभागाचे पालिका अभियंता दीपक देसाई आणि अन्य अधिकाऱ्यांचे एक पथक पुणे येथे पाठवून तेथील प्रकल्प कसा कार्यरत आहे याची पडताळणी करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी चर्चेत भाग घेताना, यापूर्वी चार कंपन्या कचरा प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने नियुक्त केल्या होत्या आणि त्या सपशेल अपयशी ठरल्या हे नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी नजरेस आणून दिले. यावेळी कचरा प्रक्रियेसाठी कंपनीची वा यंत्रणेची नियुक्ती करताना चौकस विचाराअंती निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
वैद्यकीय कचरा उचल दर कमी करावा : ठराव संमत
डायपर, सॅनिटरी पॅड्ससारखा वैद्यकीय कचऱ्याची सोनसड्यावरून बायोटेक नामक कंपनी उचल करत असून गेल्या 8 महिन्यांचे 42 लाख ऊपये बिल आले आहे. 18 ऊपये प्रति किलो अशा प्रकारे हा कचरा उचलला जातो. दिवसाला अशा प्रकारचा 800 किलो कचरा सोनसड्यावर येत असतो. त्यामुळे महिन्याकाठी 4.32 लाख ऊपये या कचरा विल्हेवाटीवर पालिकेला खर्च करावे लागतात. म्हणून जो 18 ऊ. प्रति किलो दर आहे तो 10 ते 12 ऊपये प्रति किलो असा सरकारने निश्चित करावा, असा ठराव यावेळी घेण्यात आला व तो सरकारला पाठविण्याचे ठरविण्यात आले. नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना मांडल्या. नारळाच्या करवंट्यांची विल्हेवाट लावणाऱ्या यंत्रासह बागेतील कचरा, खास करून गवत व झाडाझुडपांच्या कचऱ्याची भुकटी करणारे यंत्र घ्यावे अशी सूचना यावेळी करण्यात आली. यासाठी अन्य ठिकाणी वा राज्याबाहेर काय सुविधा आहेत त्याची माहिती जाणून घ्यावी. आवश्यकता भासल्यास अभ्यास दौरा करावा. कारण उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कदंब बसस्थानकाच्या शेजारी अशा प्रकारचा कचरा टाकण्यास मज्जाव करण्यात आल्याने प्रभागांमध्ये कचरा रस्त्याच्या कडेला व अन्यत्र जागोजागी पडून राहत असल्याचे नगरसेवक सगुण नाईक यांनी सांगितले या सूचनेनुसार तसा ठराव घेण्यात आला.
गांधी मार्केटमधील तीन दुकानांचा ताबा घेणार : नगराध्यक्ष
गांधी मार्केटमधील तीन दुकानांचा सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून ताबा घेण्याचे ठरविण्यात आले आहे, असे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी यावेळी नजरेस आणून दिले. नगरसेवक रवींद्र नाईक यांनी या दुकानदारांकडून थकबाकी यायची असल्यास ती वसूल करण्याची सूचना केली. त्यावर, सुमारे 70 हजार रु. इतकी भाडे व घरपट्टी मिळून थकबाकी असल्याचे वसुली अधिकारी भगत यांनी सांगितले.









