महानगरपालिका आरोग्य अधिकाऱयांनी दिला होता प्रस्ताव
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षकांकडील जबाबदारीत बदल करण्याचा प्रस्ताव आरोग्य अधिकाऱयांनी दिला आहे. यानुसार सामान्य प्रशासन विभागाने स्वच्छता निरीक्षकांच्या बदल्यांचा प्रस्ताव तयार केला असून महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांच्याकडे मंजुरीसाठी दिला आहे. आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर स्वच्छता निरीक्षकांच्या बदलीवर शिक्कामोर्तब होणार
आहे.
आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षकांकडे विविध जबाबदाऱया सोपविण्यात आल्या आहेत. स्वच्छता आणि व्यवसाय परवाना सर्वेक्षण, प्लास्टिक बंदी अशा विविध जबाबदाऱया सोपविण्यात आल्या आहेत. मात्र काही स्वच्छता निरीक्षक आपल्या जबाबदाऱया व्यवस्थित पार पाडत नसल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल वेळेवर घेतली जात नाही. त्यामुळे याबाबत नागरिकांनी स्वच्छता निरीक्षकांविरोधात आरोग्य अधिकाऱयांकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन स्वच्छता निरीक्षकांकडील जबाबदाऱयांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
अंतर्गत बदल्या करून अन्य वॉर्डची जबाबदारी सोपविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने अंतर्गत बदलीचा प्रस्ताव तयार करून महापालिका आयुक्तांकडे सादर केला आहे. आयुक्तांनी या प्रस्तावाला अद्याप मंजुरी दिली नाही. बदलीचा प्रस्ताव तूर्त प्रलंबित ठेवण्याची सूचना केली आहे. मात्र आयुक्तांच्या मंजुरीनंतर स्वच्छता निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.