मंत्री रवी नाईक यांना चार प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर
फोंडा : कुर्टी खांडेपार पंचायतीसाठी स्वतंत्र पंचायत घराची उभारणी तसेच सर्व धर्मिय स्मशानभूमीच्या तिसऱ्या टप्प्यातील काम तातडीने हाती घेण्यासह एकूण चार मागण्यांचे निवेदन पंचायत मंडळाने स्थानिक आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांना सादर केले. मंत्री रवी नाईक यांनी नुकतीच कुर्टी खांडेपार पंचायतीच्या खांडेपार येथील कार्यालयाला भेट देऊन येथील प्रलंबित व अत्यावश्यक विकासकामांचा आढावा घेतला. सरपंच संजना नाईक यांच्यासह अन्य पंचसदस्यांसोबत झालेल्या चर्चे दरम्यान पंचायत मंडळाने विकासकामांसंबंधी चार मागण्या प्राधान्य क्रमाने पूर्ण करण्याचा प्रस्ताव मंत्री रवी नाईक यांच्यासमोर मांडला. हाऊसिंग बोर्ड कुर्टी येथे स्वतंत्र पंचायत घर उभारण्यासाठी 900 चौ.मीटर जागेची पाहणी करण्यात आली आहे. पुढील प्रक्रियेसाठी हा प्रस्ताव लवकरच गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष जीत आरोलकर यांच्याकडे पाठविण्यात येईल. पंचायत कार्यालयासह मिनीमार्केट व सभागृह असा पंचायत घराचा आराखडा असून हा प्रस्ताव तातडीने मार्गी लागण्यासाठी मंत्री रवी नाईक यांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी पंचायत मंडळातर्फे करण्यात आली. दीपनगर कुर्टी येथे 16 हजार चौ. मीटर जागेत सर्व धर्मिय स्मशानभूमीचे काम तीन टप्प्यात विभागण्यात आले आहे. त्यापैकी मुस्लिम धर्मियांसाठी दफन भूमीचे काम पूर्ण झाले असून हिंदू धर्मियांसाठी स्मशानभूमीच्या कामाला मान्यता मिळाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील ख्रिस्ती धर्मियांच्या दफन भूमीच्या कामाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी या दुसऱ्या प्रस्तावावरही चर्चा करण्यात आली. खांडेपार भागातील तीन प्रभागांमध्ये विजेची समस्या असून त्यावर तोडगा काढण्यासाठी खांडेपार भागात स्वतंत्र वीज उपकार्यालयासह एक कनिष्ठ अभियंता, कर्मचारी व वाहनाची व्यवस्था करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. कुर्टी पंचायत क्षेत्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पथदीप मागील कित्येक दिवसांपासून पेटत नसल्याने या समस्येकडेही लक्ष घालण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी उपसरपंच विल्मा पेरेरा, पंचसदस्य मनीष नाईक, हरिष नाईक, साजिदा सय्यद व अभिजीत गावडे हे उपस्थित होते. पंचायत घराचा पाठपुरावा करण्यासाठी आपण येत्या दोन दिवसात गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष आमदार जीत आरोलकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मंत्री रवी नाईक यांनी सांगितले.









