ईडीची पीएमएलए कायद्यांतर्गत कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
महर्षि वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चार संशयित आरोपींची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये स्थावर मालमत्ता, बँक ठेवीसह अंदाजे 5 कोटी रुपयांचा समावेश आहे. नेक्कुंटी नागराज, चंद्रमोहन, गोलपल्ली किशोर रे•ाr, एटकेली सत्यनारायण यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. सुमारे 4.45 कोटी रुपये किमतीचे भूखंड, फ्लॅट आणि फर्स्ट फायनान्स क्रेडिट को-ऑपरेटिव्ह संस्थेतील 50 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 2002 च्या पीएमएलए कायद्यांतर्गत बेंगळूरच्या इडी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
काय आहे प्रकरण?
कर्नाटक महर्षि वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास निगमचे अधीक्षक चंद्रशेखरन यांनी 26 मे 2024 रोजी शिमोग्यातील निवासस्थानी आत्महत्या केली होती. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांच्या आदेशानुसार वाल्मिकी विकास निगममधील कोट्यावधी रुपये विविध खात्यांवर ट्रान्स्फर करण्यात आले आहेत, असा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर अंतर्गत तपासावेळी निगममधील गैरव्यवहार उघड झाला होता. सुमारे 89.92 कोटी रुपये बेकायदेशीरपणे विविध खात्यांवर हस्तांतर झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास कर्नाटक एसआयटी आणि सीबीआयने हाती घेतला होता. या प्रकरणात पैशांचे बेकायदा हस्तांतरण झाल्याचे आढळल्याने ईडीनेही चौकशी सुरू केली.
गैरव्यवहार प्रकरणी निगमचे माजी व्यवस्थापकीय संचालक जे. जी. पद्मनाभ, लेखा अधिकारी परशुराम दुरुगण्णावर, सत्यनारायण वर्मा आणि साईतेज यांना एसआयटीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर तत्कालिन मंत्री बी. नागेंद्र व निगमचे अध्यक्ष बसनगौडा दद्दल यांनाही चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात बी. नागेंद्र यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.









