अर्ध्यावर कारवाई ठप्प : मालमत्तांचे अतिक्रमण हटविण्याचे आव्हान
बेळगाव : शहरातील मालमत्ता सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सध्या कारवाई अर्धवटस्थितीत सोडण्यात आल्याने अतिक्रमण वाढू लागले आहे. मालमत्तेचे वेळेत सर्वेक्षण करून अतिक्रमण हटविण्याचे आव्हान मनपासमोर उभे ठाकले आहे. शहरातील मालमत्ता सर्वेक्षणाचे काम प्रलंबित राहिल्याने ते कधी पूर्णत्वास जाणार? असा प्रश्नही पडला आहे. शहरात मनपाला कोट्यावधी रुपयांची उत्पन्न देणारी मालमत्ता आहे. मात्र काही ठिकाणी या मालमत्तांवर अतिक्रमण झाल्याने उत्पन्नापासून दूर राहावे लागले आहे. तर काही मालमत्ताधारकांकडून लाखो रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. त्यामुळे मनपासमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. कृती आराखड्यानुसार सर्वेक्षणाला प्रारंभ झाला. मात्र राजकीय हस्तक्षेप व नोंदणीची समस्या आदी कारणांमुळे सर्वेक्षण अर्धवटस्थितीत राहिले आहे. मनपाच्या एकूण मिळकतीपैकी 20 हजाराहून अधिक मालमत्तांवर अतिक्रमण झाले आहे. दरम्यान काही मनपाच्या मालकीच्या मालमत्ता खासगी व्यक्तींच्या मालमत्ता झाल्या आहेत. अशा बेकायदेशीर मालमत्तांचे सर्वेक्षण होणार आहे. शहरात एक लाख 48 हजार मालमत्ताधारक आहेत. त्यातून मनपाला कोट्यावधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. त्याचबरोबर मनपा अखत्यारितील बाजारपेठ, औद्योगिक वसाहत, सार्वजनिक निवासक्षेत्र, इमारती, उद्याने, वाहनतळ आदींतून उत्पन्न मिळते.
नगरसेवक गप्प का?
मनपाची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आहे. मात्र व्यवस्थापन आणि दुर्लक्षामुळे खासगी व्यक्तींचे त्यावर अतिक्रमण झाले आहे. काहींनी बनावट कागदपत्रे तयार करून ताबा मिळविला आहे. मात्र याबाबत मनपा बैठकीत आवाज उठविण्याऐवजी नगरसेवक गप्प बसत आहेत. मालमत्ता सर्वेक्षणाबाबत अधिकाऱ्यांशी विचारपूस होणे आवश्यक आहे.
तातडीने काम पूर्ण करण्यात येईल
मनपा अखत्यारितील मिळकतीच्या सर्वेक्षण कामाची परिस्थिती काय आहे, याची माहिती मिळविली जाणार आहे. सर्वेक्षणाचे काम रखडल्यास ते तातडीने पूर्ण करण्यात येईल.
– अशोक दुडगुंटी (मनपा आयुक्त)









