हल्लेखोर कारमधून फरार : 10 राउंड गोळीबार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी एका प्रॉपर्टी डीलरची गोळ्या घालून हत्या केली. पश्चिम विहार पोलीस स्टेशन परिसरातील स्टेट बँक नगरमध्ये ही घटना घडली. हल्लेखोरांनी कारला लक्ष्य करत 8 ते 10 राउंड गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले. गोळी लागल्यानंतर राजकुमार दलाल हा तरुण गंभीर जखमी झाला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणात परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
मृत राजकुमार दलाल याचे कुणाशीही वैर नव्हते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी तो गाडीने जिमला जात असताना त्याच्यावर गोळीबार झाल्याची माहिती कुटुंबडयांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तपासानंतरच हत्येमागील कारण स्पष्ट होईल.









