महापालिका करणार सोमवारपासून धडक कारवाई : मिळकतीवर बोजा नोंद होणार : चार वसुली पथकांची नियुक्ती
कोल्हापूर :
महापालिकेच्या घरफाळा विभागाच्या वतीने शहरातील थकीत घरफाळा मिळकतधारकांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. ज्यांना नोटीस बजावून अद्यापही घरफाळा भरलेला नाही अशा मिळकतधारकांच्या मिळकती सिल करुन त्या मिळकतीवर बोजा नोंद करण्याची धडक कारवाई महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे. सोमवारपासून या कारवाईला सुरुवात होत असून, चार वसुली पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागास सन 2024-25 या वर्षाकरीत 101 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. एप्रिल ते 13 डिसेंबर 2024 अखेर शहरातील 86 हजार 180 मिळकतधारकांनी 41 कोटी 70 लाख रुपयांचा घरफाळा महापालिकेकडे जमा केला आहे. कायद्यातील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2024 पासून राहिलेल्या मिळकतींच्या चालू घरफाळा आकारणीवर दंड आकारला जात आहे. तसेच घरफाळा विभागामार्फत थकबाकी वसुली मोहिमेकरीता चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत 4 वसुली पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे शहरातील थकबाकीदारांना नोटीसा लागू करण्यात आलेल्या आहेत. मिळकतींना नोटीसा देऊनही ज्या थकबाकीदारांनी अद्यापही आपला कराचा भरणा केलेला नाही अशा मिळकतधारकांच्या मिळकती सिल करुन बोजा नोंद करण्याच्या कारवाईच्या नोटीसाही देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सोमवार (16 डिसेंबर) पासून बोजा नोंदविण्याची कारवाई सुरु करण्यात येणार आहे.
शहरातील 21,909 मिळकतींचे घरफाळा रिव्हीजन सर्व्हेचे काम पूर्ण
शहरामध्ये माहे नोव्हेंबर 2023 पासून घरफाळा रिव्हीजन सर्व्हेचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. यामध्ये 21,909 इतक्या मिळकतीचा रिव्हीजन सर्व्हे पूर्ण केला आहे. त्यानुसार संबंधीत मिळकतधारकांना कागदपत्रे सादर करणेबाबत नोटीसही लागू केल्या आहेत. अद्यापही कागदपत्रे सादर न केलेल्या मिळकतधारकांवर नियमातील तरतूदीप्रमाणे कर आकारणी अंतिम करुन वाढीव रक्कम त्यांच्या बिलात समाविष्ट करण्याची कारवाई करण्यात येत आहे. तरी शहरातील सर्व मिळकतधारकांनी अद्यापही आपला घरफाळा भरणा केलेला नसेल त्यांनी आपला थकीत घरफाळा भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आलेला आहे








