तालुक्यातील नदी-नाल्यावर नवीन बंधारे, बंद योजना कार्यान्वित करून हरितक्रांती घडवण्याची आवश्यकता : आमदार विठ्ठल हलगेकरांच्या इच्छाशक्तीची गरज
खानापूर : खानापूर तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा केवळ 30 टक्के पाऊस झाल्याने नदी-नाले येत्या महिन्याभरात कोरडे पडण्याची शक्यता आहे. तालुक्यातील भू-जल पातळीही बरीच खालावणार आहे. अनेक गावात पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी तालुक्यातील सर्व नदी-नाल्यावर छोटेमोठे बंधारे बांधणे गरजेचे आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी इच्छाशक्ती दाखवून या योजना राबवणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यात हरितक्रांती घडवून शेतकरी सुजलाम सुफलाम होतील तसेच पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगाही निघेल. तालुक्याला निसर्गाचा वरदहस्त लाभला असून, पश्चिम व दक्षिण भागात घनदाट जंगल, डोंगर दऱ्या, खळखळून वाहणारे नदी-नाले त्यामुळे तालुका निसर्गसंपन्न आहे. तालुक्यात अनेक महत्त्वाच्या नदी-नाल्यांचा उगम झाला आहे. वनसंपती बरोबर विपूल जलसंपत्तीही आहे. तालुक्यात उगम पावणाऱ्या नदी-नाल्यांचा, जलसंपत्तीचा फायदा इतर भागातील जनता घेत आहे. पण या जलसंपत्तीवर तालुक्यात मात्र शाश्वत योजनाच नसल्याने जनतेला या जलसंपत्तीचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही. त्यासाठी मलप्रभा, हलात्री, म्हादई, पांढरी, हलतर या नदीसह मोठ्या नाल्यावर बंधारे बांधून पाणी अडवून जलसिंचन योजना राबवल्यास शेतकऱ्यांना वेगवेगळी पिके घेता येतील. आजपर्यंत जलसंपत्तीच्या उपयोगासाठी कोणतेच नियोजन करण्याचा प्रयत्न झाला नाही. येथे मोठ्या नद्या, शेकडो नाले आहेत. मात्र यांचे पुनरुजीवन अथवा तालुकांतर्गत नदीजोड प्रकल्पावर कोणताच विचार झाला नाही. यामुळे तालुक्यात म्हणावी तसी हरितक्रांती झाली नाही. केवळ कूपनलिकाद्वारे काही ठिकाणी रब्बी पिके घेतात. जर वाहून जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास उन्हाळी पिकांतून आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होणार आहे. यासाठी तातडीने भविष्यकाळात नियोजनासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे. यासाठी आमदारानी तालुकाभर अभ्यास दौरे करून जलसिंचनाचा शास्त्रज्ञाद्वारे आराखडा तयार करणे गरजेचे आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलेगकर यांनी आपली प्रबळ इच्छाशक्ती दाखवून तालुक्याचे भविष्य बदलण्याची मागणी करण्यात येत आहे.
बहुतांश नद्यांचा उगम खानापूर तालुक्यात मात्र, फायदा इतरांना
तालुक्याची जीवनदायिनी म्हणून आपण मलप्रभेकडे पाहतो. मात्र या नदीच्या पाण्याचा उपयोग खानापूर तालुक्याला न होता बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्गमार्गे धारवाड जिल्ह्याला होत आहे. बारामाही तुडुंब भरून वाहणाऱ्या म्हादईचा उगमही तालुक्याच्या पश्चिम भागात होत असला तरी हे पाणी शेजारच्या गोवा राज्यात जात असल्याने हेही पाणी खानापूर तालुक्यासाठी उपयोगात आणलेले नाही. या नदीच्या जलस्त्रोतामुळे गोवेकराना खरा लाभ झाला आहे. मार्कंडेय नदीचा उगमही खानापूर तालुक्यात झाला असला तरी त्याचा लाभ बेळगाव, हुक्केरी तालुक्याला होत आहे. शिवाय पांढरी, मंगोत्री आदी नद्यांचेदेखील उगमस्थान खानापूर तालुक्यात असले तरी या नद्यांच्या पाण्याच्या उपयोगाबाबत कोणताच विचार करण्यात आला नाही. तालुक्यामध्ये हलात्री, कळसा, हलत्तर, भांडुरा, कोडणी यासारखे मोठे नाले वाहतात. पण त्यांचे पाणीदेखील म्हादई नदीला मिळून अखेर ते सर्व पाणी समुद्राला मिळते. आता तर कर्नाटक शासनाने बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग,. धारवाड, हुबळी, नवलगुंद, नरगुंद, रोण आदी तालुक्यातील पाणी समस्या सोडवण्यासाठी कळसा-भांडुरा योजना आखली. या योजनेत बदल करून सरकार हे पाणी गदग, धारवाड, कोप्पळ या जिल्ह्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नात आहे. मात्र केंद्राच्या हरित लवादाकडून याला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. या प्रकल्पाविरोधात गोवा आणि महाराष्ट्र सरकारने हरकत घेतली आहे. सध्या मलप्रभा नदीवर आमटे, देवाचीहट्टी, असोगा, जळगा, यडोगा, व•sबैल, कामशिनकोप, चिक्कहट्टीहोळी येथे लघुपाटबंधारे खात्याचे ब्रिजकम बंधारे आहेत. तट्टीनालासारख्या योजना कार्यान्वित आहेत, पाटबंधारे खात्याच्या खानापूर शहराला पाणीपुरवठा करणारा बंधारा आहे. मात्र जलस्त्रोताचा विचार केल्यास आणखीन 25 ते 30 छोटेमोठे बंधारे आवश्यक आहेत. फक्त मलप्रभा नदीचा विचार न करता सर्वच नदी नाल्यावर या योजना झाल्या पाहिजेत. त्यामुळे शेती उद्योगाला मोठे पाठबळ मिळणार आहे. त्यातून शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामाचा वापर करुन शेतीचे उत्पन्न वाढवू शकतो. येथे मोठ्या प्रमाणात नदी नाले असले तरी उन्हाळ्यात अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. नदी नाल्यांच्या पात्र कोरडे पडते. त्यामुळे अनेक गावाना पिण्याच्या पाण्यापासून समस्या भेडसावते. विशेष म्हणजे कणकुंबी, आमगाव, मान, व्हळंद, पारवाड, चिखले, गवसे, आमटे, चोर्ला, बेटणे, तळावडे यासह अनेक गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
तालुक्यात जवळपास 250 तलाव
तालुक्यात जवळपास 250 तलाव आहेत. या तलावांच्या विकासासाठी अमृतसरोवर योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र या निधीचा योग्यरीतीने वापर झालेला नाही. या तलावात काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. जर या सर्व तलावांचे योग्यप्रकारे खोलीकरण करून पाणी साठविल्यास अनेक प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
सीमाभागावरील अवकृपेमुळे धरण गेले सौंदतीला
खानापूर तालुक्यातील पाण्याचा तालुक्यासाठीच वापर व्हावा, या दृष्टीने कर्नाटक सरकार कोणतीच योजना राबवण्याच्या मनसिकतेत दिसत नाही. यापूर्वी असोगा येथे धरणासाठी नैसर्गिक जागा होती. या ठिकाणी धरण बांधण्याचे निश्चितही झाले होते. मात्र कर्नाटक सरकारच्या सीमाभागावरील अवकृपेमुळे हे धरण सौंदत्ती येथे बांधले. त्यामुळे तालुक्यातील विकासाला खिळ बसली.









