आमदार जोशुआ डिसोझा यांची माहिती, सांस्कृतिक, अग्निशमन, पोलीस, आरोग्य खात्यासाठीही कक्ष
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा येथील जागृत देवस्थान श्री देव बोडगेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव येत्या 5 जानेवारी 2023 रोजी साजरा होणार आहे. यंदा जत्रोत्सवनात्त योग्यरित्या आणि योग्य पद्धतीने जत्रोत्सवाचे आयोजन व नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी आयोजित बैठकीनंतर पत्रकारांना दिली.
यावेळी नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, उपनगराध्यक्ष शेखर बेनकर आदी नगरसेवक, अग्निशमन दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव, पोलीस निरीक्षक परेश नाईक आदी पोलीस, वीज, पीडब्ल्यूडीचे अभियंता वर्ग, देवस्थान अध्यक्ष आनंद भाईडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
म्हापसा बोडगेश्वर जत्रोत्सवात यंदा 840 स्टॉलची नोंदणी झालेली आहे. येथे दुर्घटना घडल्यास योग्यरित्या बंब आतमध्ये येण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पाणी पुरवठा जत्रोत्सवाच्या काळात 24 तास असेल शिवाय पार्किंग व्यवस्थेसाठी मध्ये डिव्हायडर घालून आजूबाजूच्या शेतात पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याचे आमदारांनी सांगितले.
पहिल्यावेळी आम्हाला दिसून येते की, कमिटीने आराखडा तयार केला असून त्यानुसार नियोजन केले आहे. वेगळे फुडकोर्ट अग्निशमन दल, आरोग्य खाते, ट्राफिक पोलिसांसाठी वेगळा कक्ष, शिवाय वेगळा मनोरंजन कक्षही तयार केला आहे. पार्किंग व्यवस्थाही सुरळीत केली. पालिका व इतर सर्वांचे या जत्रेला सहकार्य लाभणार आहे अशी माहिती आमदारांनी दिली.
4 जानेवारीला देवाचा वर्धापनदिन होऊन 5 जानेवारीला जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. नंतर प्रत्येक दिवशी 12 तारीखपर्यंत सार्वजनिक श्री सत्यनारायण पूजा होणार आहे. नंतर अन्य चार दिवस वाढवून घेतले असून त्यादरम्यान जो कुणी पुजेला बसणार त्याला पुजेचा भार उचलावा लागणार आहे. सोन्याचा दंड येत्या 4 जानेवारीला अर्पण करणार आहोत. ही जत्रा यंदा प्लास्टिक मुक्त होणार आहे. भाविकांनी जत्रेला येऊन श्रींचे दर्शन घ्यावे असे देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर म्हणाले.
नियोजित पद्धतीने जत्रा सादर करण्यासाठी आम्ही आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ही जत्रा साजरी करण्यात येणार आहे, त्यात सर्व आम्ही दाखविले आहे. ही जत्रा नियोजित पद्धतीने व प्लास्टिक मुक्त होणार आहे. कचऱयासाठी स्टॉल धारकाकडून डिपॉझिट घेणार आहोत. तेथे कचरा होणार नाही हा उद्देश आम्ही ठेवला आहे. देवाच्या दंडसाठी देणगी द्यावी व दंड पाहण्यासाठी सर्वांनी यावे असे सचिव ऍड. वामन पंडित यांनी सांगितले.
शेतकऱयांनी काही विरोध दर्शविला तरी काही शेतकरी स्टॉल धारकाकडून पैसे घेतात असे ते म्हणाले. त्यांनी नाहक विरोध करू नये अशी मागणी यावेळी पदाधिकाऱयांनी केली.









