सर्फनाला, धामणी प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक
आजरा तालुक्यातील सर्फनाला व राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पाच्या पुनर्वसनाची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा, असे आदेश आमदार प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्यासह संबंधित यंत्रणेला दिले. तसेच या दोन्ही प्रकल्पांचे काम एप्रिल-मेपर्यंत पूर्ण करा, जेणे करुन पावसाळ्यात येथे घळभरणी करता येईल, असेही निर्देश आ. आबिटकरांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्फनाला व धामणी प्रकल्पासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, भुदरगड प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, राधानगरी प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त के. बी. आरबुणे, दीपक पाटील, दिलीप डवर, अंकुश जिनगरे, महादेव पाटील, सुरेश मिटके आदी उपस्थित होते.
बैठकीत आ. आबिटकर यांनी दोन्ही प्रकल्पांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेऊन संबंधित यंत्रणेला योग्य ते निर्देश दिले. त्याचबरोबर सर्फनाला प्रकल्पासंदर्भात झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनी कसण्यायोग्य करण्यासाठी त्याचे तात्काळ सपाटीकरण करावे, वाटप झालेल्या जमिनींचे दिशादर्शक नकाशे तयार करुन त्यांचे तात्काळ वाटप करावे, संपादित केलेल्या शेतघरांची किंमत वाढीव दराने मिळण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, शेळप गावठाणमधील घर बांधण्यासाठी दिलेले प्लॉट हे घर बांधण्यासाठी अयोग्य असून ते बदलून द्यावेत, शेतजमिनीत गावठाणाबाहेर बांधलेल्या घरांचे मुल्यांकन करुन मोबदला द्यावा, असे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
त्यानंतर धामणी प्रकल्पासंदर्भात झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना मिळालेल्या जमिनी या ‘ब’ वर्ग असून त्या ‘अ’ वर्ग करुन घ्याव्यात, संकलनामध्ये न आलेले निवाडे मार्गी लावावेत, राई येथील गट क्रमांक 83 मधील राहीलेले ‘कजाप’ पूर्ण करुन घ्यावे, कंदलगाव चौक वेस्ट वेअरचे काम सुरु असून त्या ठिकाणी काही घरे बाधित होत असून ती संपादित करुन त्याचा मोबदला संबंधितांना द्यावा, राईमधील 47 शेतकर्यांचे प्लॉट संपादन झाले असून त्याची संकलनात नोंद करुन लवकर संबंधितांना प्लॉटचे वाटप करावे, प्रकल्पग्रस्तांना निर्वाह भत्ता वाटप करण्यात यावे, नवीन गावठाण वसाहतींना आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा पुरवाव्यात, राई, कंदलगाव, पडसाळी, मानबेट येथील प्रकल्पासाठी संपादित न झालेल्या जमिनींवरील प्रकल्पाचा शेरा कमी करुन घ्यावा, राई येथील गावठाणाचे ड्रोनद्वारे मोजणी करण्यात आली असून यामध्ये अद्याप हद्दी दाखविल्या नसून त्या दाखवाव्यात, असे निर्णय झाले.