काणकोण : काणकोणचे लोक बुद्धिवादी, कल्पक, सक्षम, हुशार आणि कुशलता प्रधान आहेत आणि आपण आयआयटीच्या बाबतीत गंभीर आहे. काणकोण तालुक्यात कोमुनिदादीच्या मालकीची लाखो चौ. मी. जमीन आज पडीक अवस्थेत पडून आहे. अशा जमिनीवर एखादा प्रदूषणविरहीत प्रकल्प आणण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर आणि आपण स्वत: प्रयत्नशील आहे. मात्र तालुक्यातील समाविचारी लोकांशी चर्चा करूनच त्याला चालना दिली जाईल, असे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी रविवारी एका कार्यक्रमासाठी काणकोणात आल्यावेळी स्थानिक पत्रकारांशी बोलताना सांगितले. बऱ्याच वेळा समाजातील 90 टक्के लोक सकारात्मक विचार करणारे असतात. मात्र अशा व्यक्ती पुढे येत नाहीत. त्यामुळे 10 टक्के लोक, जे एखाद्या प्रकल्पाला विरोध करतात, त्यांचे फावते. आपण सर्वांनी दूरगामी विचार करायला हवा. भावी पिढीला गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात आणि ती जबाबदारी सरकारची आहे. कोणत्याही परिस्थितीत आयआयटी सांगे मतदारसंघातच होणार आहे, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
आपण स्वत: मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष आहोत. त्यामुळे काणकोणच्या भगवती पठारावर फिल्म सिटी उभारण्याचा आपल्या सरकारचा विचार आहे. त्याशिवाय कृषीविषयक प्रकल्प आणि एखादे विद्यापीठ अशा प्रकारचे प्रकल्प जर या ठिकाणी आले, तर या तालुक्यातील बेरोजगारांना जशा संधी उपलब्ध होतील त्याचप्रमाणे त्याचा लाभ सांगे मतदारसंघातील बेरोजगारांना देखील होईल. त्यामुळे दूरगामी विचार करूनच पावले उचलण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. स्थानिक कोमुनिदादीचा अशा प्रकारच्या प्रकल्पांना पूर्ण पाठिंबा असून लोकांची मते देखील विचारात घेण्यात येणार आहेत. विकासकामात राजकारण न आणता आणि प्रत्येक गोष्टीला विरोध न करता युवकांच्या भवितव्याचा विचार करणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन येणाऱ्या काळात काणकोण मतदारसंघाचा सकारात्मक विकास करण्याकडे राज्य सरकार लक्ष देत आहे. त्याला काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांचा पूर्ण पाठिंबा आहे, असे फळदेसाई पुढे म्हणाले.









