व्यावसायिक भागिदारांमार्फत कॅबिनेट मंत्र्यांचे उद्योग– काँग्रेसचा आरोप
प्रतिनिधी/ पणजी
बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे भाजपचे धोरण गोव्याच्या मुळावर उठणार असून काही कॅबिनेट मंत्रीच आपल्या व्यावसायिक भागिदारांच्या लाभासाठी जमिनींचे ऊपांतरण करत आहेत, पेडणे तालुक्यात असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यामुळे स्थानिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसने केला आहे.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत व्हेरियाटो फर्नांडिस, जितेंद्र गावकर व प्रणव परब यांची उपस्थिती होती. मोरजी भागात अशा प्रकारांना ऊत आला असून सध्या एका ठिकाणी तब्बल 62 हजार चौरस मीटर जमीन ‘ऑर्चड’ मधून ‘सॅटलमॅन्ट’ मध्ये रूपांतरित केल्याचा दावा त्यांनी केला. कॅबिनेट मंत्र्यांचा व्यावसायिक भागीदार असलेल्या रे•ाr नामक व्यक्तीसाठी सदर जमीन सेटलमेंट करण्यास मान्यता देण्यात आल्याचे फर्नांडिस पुढे म्हणाले.
सरकार रिअल इस्टेटला प्रोत्साहन देत असून अशाप्रकारे ऑर्चड जमिनींचे रूपांतरण करण्यात आल्यास आमच्याकडे जमिनीच उरणार नाहीत. येथे मेगा प्रकल्प येतील. सरकारची ही लूट खूप मोठी आहे. अशा मेगा प्रकल्पांना मंजुरी दिल्यास लोकांना पाणी मिळणेही मुश्कील होईल, असेही ते म्हणाले.
श्री. गावकर यांनी बोलताना, मालमत्तांचे अशाप्रकारे ऊपांतर होत राहिल्यास गोव्याचे अस्तित्वच धोक्यात येईल. पेडणे तालुक्याला भविष्यात प्रचंड त्रास सहन करावे लागतील. एका बाजूने म्हादई कर्नाटकात वळविण्यात आली आहे तर तिळारीचे पाणी मोपा विमानतळाकडे वळविण्यात येत आहे. अशावेळी अतिरिक्त पाणी कुठून आणणार? असा सवाल त्यांनी केला.
श्री. परब यांनी बोलताना, ‘आम्ही विकासाच्या विरोधात नाहीत. पण तो योग्य मार्गाने झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले.









