तब्बल 31 कोटींच्या निधीतून विकास : मात्र इतर प्राथमिक सुविधांपासून प्रवाशी वंचित
बेळगाव : स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाचे काम शिल्लक असतानादेखील थाटात उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे दैनंदिन प्रवास करताना प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शिवाय उद्घाटन होऊन सहा महिने उलटल्यानंतर आता उर्वरित विकासकामांना चालना देण्यात आली आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या उद्घाटनानंतर विकासकामे सुरू असलेली दिसत आहेत. विधानसौध येथे भरविण्यात आलेल्या अधिवेशनासाठी सारे मंत्रिमंडळ बेळगावात आले होते. दरम्यान मंत्र्यांच्या हस्ते घाईगडबडीत बसस्थानकाचे काम अर्धवट स्थितीत असतानादेखील उद्घाटन थाटात करण्यात आले होते. दरम्यान, प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे. केवळ बसस्थानकाची इमारत उभारण्यात आली होती. फलाट, संरक्षक भिंत, शौचालय आणि इतर कामे अद्याप शिल्लक आहेत. आता बसस्थानकातील संरक्षक भिंतीच्या कामाला चालना देण्यात आली आहे. शिवाय पार्किंगचे कामदेखील हातात घेण्यात आले आहे. स्मार्ट सिटीतून तब्बल 31 कोटींच्या निधीतून हा विकास साधला जात आहे. मात्र सहा वर्षे उलटूनदेखील अद्याप बसस्थानकाचे काम अपूर्णावस्थेतच आहे. त्यामुळे स्मार्ट बसस्थानकात प्रवाशांना अद्यापही सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. बसस्थानकात फलाट उभारणी, पिण्याचे पाणी, शौचालय, संरक्षक भिंत आणि इतर सुविधा पुरविणे गरजेचे आहे. केवळ बसस्थानक इमारत स्मार्ट झाली आहे. मात्र इतर प्राथमिक सुविधांपासून प्रवाशांना दूर राहावे लागत आहे. त्यामुळे बसस्थानकात पिण्याचे पाणी, प्राथमिक सुविधांची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.









